सामान्य माणूस असो वा एखादा हिंदी कलाकार कायदा व सुव्यस्थेच्या घटनांमधून कोणालाही सुटका मिळाली नाही. अशाच एका अडचणीत सापडला आहे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव. आपल्या हटके विनोद शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता राजपाल यादव आता अभिनया व्यतिरिक्त एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. अभिनेता राजपाल यादवची कोटयावधी रुपयांची संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी राजपाल यादवने बँकेकडून कर्ज घेतले होते परंतु वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेकडून ही कारवाई करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. (Rajpal Yadav Property)
२०१२ साली ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी राजपालने सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून तब्बल ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची काहीही रक्कम परत न केल्याने संपूर्ण कर्ज आता ११ कोटींच्या घरात पोहचले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या कर्जासाठी राजपालने वडिलांच्या नावावर असलेली घर व जमीन बँकेकडे गहाण ठेवली होती. बँकेकडून आता त्याच घरावर व जमिनीवर जप्ती आणल्याचं समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली असून रातोरात बँकेकडून “सदर मालमत्ता बँक ऑफ इंडियाची असून त्यावर कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करू नये” अशा प्रकारचा बोर्ड लावण्यात आला आहे.

राजपाल यादववर या आधी ही अशाच प्रकारची एक कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही एका चित्रपटासाठी राजपाल यादवने एका बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परत फेड न करता आल्यामुळे राजपालला ३ महिन्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. दिल्लीयेथील ‘मुरली प्रोजेक्ट्स’ या कंपनीकडून राजपाल यादवच्या ‘श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंट’ या कंपनीविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. (Rajpal Yadav Property)
राजपाल यादवने हिंदी मनोरंजन सृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. राजपलच्या हटके विनोदशैली ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘खट्टा मिठा’, ‘भूल भुल्लया’,’ढोल’,’दे दना दन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये धमाल भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.