Pune Hospital Death Case : प्रचंड वेदना, रक्तस्त्रावमुळे व्याकुळ, बीपी वाढला त्याक्षणी गर्भवती महिलेने रुग्णालय गाठलं. उपचार होतील या अपेक्षेने ती गर्भवती माऊली डॉक्टरांकडे बघत होती. लगेचच सी-सेक्शन करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला. पण आडवे आले ते पैसे. मग यापुढे जे काही घडलं ते माणसातल्या माणूसकीलाही काळीमा फासणारं आहे. हा संपूर्ण प्रकार नक्की काय याची पुसटशी कल्पना तुम्हाला आलीच असेल. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली ही घटना. गर्भवती महिला तनिषा भिसे यांची प्रकृती गंभीर असताना डॉक्टरांकडून उपचार करण्यास नकार देण्यात आला. यांस कारणीभूत २० लाख रुपये ठरले. तनिषा यांना प्रचंड त्रास होत असतानाही डॉक्टरांसह नर्स यांनी साधं पाहिलंही नाही. पुन्हा एकदा पैशापुढे माणूसकी हरली.
जन्मतःच जुळ्या मुलींनी आईला गमावलं
मृत गर्भवती महिला तनिषा भिसे या भाजपाचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. उपाचारांअभावी तनिषा यांना त्यांचा जीव गमवावा लागला. दुर्देव म्हणजे त्यांच्या पोटी जन्मलेल्या जुळ्या मुलींनी डोळे उघडण्यापूर्वीच आईला गमावलं. इतकं होऊनही रुग्णालयाने मात्र सगळे आरोप फेटाळत मृत महिला व त्यांच्या कुटुंबियांनाच जबाबदार धरलं आहे.
रुग्णालयाचे भिसे कुटुंबियांवरच आरोप
तनिषा यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात याआधीही शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्यांना बिलाच्या एकूण रकमेमध्ये ५० टक्के सूट देण्यात आली होती. आता त्यांची प्रेग्नंसी ही धोक्याची होती. म्हणूनच डॉक्टरांनी वारंवार तपासणीसाठी तनिषा यांना बोलावलं होतं मात्र त्या आल्याच नाहीत. शिवाय डॉक्टरांनी मूल दत्तक घेण्याचा सल्लाही त्यांना दिला होता. त्रास होत असताना तनिषा जेव्हा रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांना तपासणीनंतर पैसे भरा असं सांगण्यात आलं. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कोणतीच माहिती न देण्यात दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तनिषा या गर्भवती महिलेचं काय झालं? हे डॉ. घैसास व रुग्णालयाला काहीच कल्पना नव्हती. वरील दिलेली संपूर्ण माहिती रुग्णालयाच्या चौकसी अहवालात देण्यात आली आहे.
भिसे कुटुंबियांनी सांगितली सत्य परिस्थिती
एबीपी माझाशी भिसे कुटुंबियांनी संवाद साधला. यावेळी तनिषा यांच्या नणंदेने संपूर्ण घटना सांगितली. त्या म्हणाल्या, “आम्हाला समजलं की, कालच एका मुलीला व्हेंटिलेटरवरुन काढलं आहे. आता त्या दोघींचीही तब्येत नीट आहे. मीच त्या दोघींना बघत आहे. मी तनिषा भिसे यांची नणंद आहे. आम्ही ९ वाजता सकाळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गेलो. तिथे जाऊन आम्ही सगळी तपासणी केली. बीपी वाढला असल्यामुळे डॉक्टर घैसास यांना आम्ही तसं कळवलं. १५०/१०० वगैरे बीपी होता. तेव्हा सांगण्यात आलं की, नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर आणा. तिथे गेल्यानंतर काही ज्युनिअर डॉक्टर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही डॉक्टर घैसास यांना कळवलं आहे”.
डॉक्टरांच्या बोलण्यामुळे मोठा धक्का अन्…
“सध्या काही खाऊ नका. परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे लगेचच आपल्याला सी-सेक्शन करावं लागेल. त्यानंतर ऑपरेशनआधी जी प्रक्रिया असते ती करायला सुरुवात झाली. शेव्हिंग केली, कपडेही बदलायला सांगितले. त्यानंतर डॉक्टर घैसास आले. त्यांना मी, वहिनी व भाऊ भेटलो. ते आम्हाला बोलले रक्तस्त्राव होत आहे, पोटात दुखत आहे, बीपी वाढला आहे तर आपल्याला लगेच सी-सेक्शन करावं लागेल. Premature डिलिव्हरी असल्यामुळे बाळांना आपल्याला NICUमध्ये ठेवावं लागेल. NICU चा एकाचा खर्च १० लाख रुपये आहे. तुम्हाला एकूण २० लाख भरावे लागतील”.
पैशांअभावी जीव गेला
“आम्ही त्यांना विनवणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, आता १० लाख तरी भरा. तरीही तुम्हाला जमत नसेल तर जवळच ससून रुग्णालय आहे तिथे जा. तिथेही उपचार चांगले होतात. एवढं सगळं त्यांना पेशंटसमोर म्हणजे माझ्या वहिनीसमोरच सांगितलं. वहिनीची परिस्थिती गंभीर असताना तिच्यासमोर ते हे सगळं बोलले आणि निघून गेले. वहिनी माझी रडत होती. पैशांची व्यवस्था करतो तुम्ही उपचार तरी सुरु करा असंही सांगितलं. पण ते आम्हाला बोलले की, तुमच्याकडे आधीच असणारे रक्तस्त्रावची औषधं तुम्ही घ्या. आम्ही आमच्याकडीलच औषधं वहिनीला दिली. तोपर्यंत त्यांनी काहीच उपचार केले नाहीत”. रुग्णाला जवळून बघूनही घेतलं नसल्याची तक्रारही यावेळी नातेवाईकांनी केली. स्ट्रेचरवर घेऊन जाण्यास रुग्णालयातील नर्स, कर्मचारी पुढे आले नाहीत. तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली, शेती विकून पैसे भरु असंही सांगितलं तरी रुग्णालयाने पीडितेकडे व त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं असंही नातेवाईक म्हणाले.
आणखी वाचा – “माझ्या मांडीवर त्यांनी जीव सोडला आणि…”, वडिलांच्या निधनानंतर हळहळले किरण माने, म्हणाले, “शांतपणे गेले…”
अमोल कोल्हे काय म्हणाले?
अनेक राजकीय मंडळींनी या प्रकरणाबाबत कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर अमोल कोल्हेंनीही कठोर शब्दांत त्यांचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “सात महिन्यांची गरोदर असलेली एक भगिनी प्रचंड रक्तस्त्रावात वेदनांमध्ये विव्हळत होती. अशावेळी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने १० लाख भरले नाही म्हणून त्या भगिनीला मृत्यूच्या दाढेत ढकललं. ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी, व्यवस्था म्हणून आपला नाकर्तेपणा उघड करणारी आहे”.
सात महिन्यांची गरोदर असलेली एक भगिनी प्रचंड रक्तस्त्रावात वेदनांमध्ये विव्हळत होती. अशा वेळी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने १० लाख भरले नाही म्हणून त्या भगिनीला मृत्यूच्या दाढेत ढकललं… ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी, व्यवस्था म्हणून आपला…
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 3, 2025
“विशेष म्हणजे पीडित भगिनी ही सत्ताधारी आमदारांशी संबंधित होत्या, त्यांच्यावर उपचार करावेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विनंतीही करण्यात आली होती, तरीही हे “धर्मादाय” रुग्णालय आपल्या असंवेदनशील भूमिकेवर ठाम राहिले. या भगिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, तिच्या जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी”. सर्व स्थरांमधून कारवाईची मागणी होत असताना भिसे कुटुंबियांना पुन्हा त्यांची तनिषा आणि जुळ्या मुलांना त्यांची आई मिळणार का? हा प्रश्न राहतोच…