वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट आहे. अवघ्या विशीत वैष्णवीने तिचा जीव गमावला. शशांक हगवणेसह दोन वर्षांपूर्वी वैष्णवीचं थाटामाटात लग्न झालं. लग्नात ५१ तोळं सोनं, एक फॉर्च्युनर आणि इतर महागड्या वस्तू मुलाला देण्यात आल्या. इतका खर्च करुनही हगवणे कुटुंबियांकडून वैष्णवीला त्रास सुरुच राहिला. या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हगवणे कुटुंबिय राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे नेता होते. आर्थिक परिस्थितीही चांगली असून हुंडा प्रकार त्यांनी स्वीकारला. पण त्यांनी यापुढेही जाऊन कुटुंबातील सूनेचा छळ सुरुच ठेवला. आता या सगळ्या प्रकरणावर कलाकार मंडळीही संताप व्यक्त करत आहेत. (Vaishnavi Hagawane Death Case)
वैष्णवी हगवणे प्रकरणाला आज नवं वळण मिळालं. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना ताब्यात घेण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून दोघंही फरार होते. आता या प्रकरणाला नवी दिशा मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. शिवाय गुरुवारी (२२ मे) वैष्णवीच्या १० वर्षीय मुलालाही तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सगळ्याच स्थरातून राग व्यक्त होत आहेत. मराठी कलाकारांनीही या विरोधात आवाज उठवण्यात सुरुवात केली आहे.

प्रविण तरडे यांनी फेसबुकद्वारे संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. प्रविण यांनी वैष्णवी हत्याप्रकरणाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी मागणीही केली आहे. तसेच हुंडाबळी विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रविण म्हणाले, “हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं प्रॉपर्ट्या पेटवून द्या. कुणा बहिणीचा असा छळ सुरु असेल तर पुढे येऊन बोला. समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी आहोत”.
आणखी वाचा – “एका मुलीचा बाप म्हणून…”, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “गप्प बसून…”
प्रविण यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटद्वारे आपलं मत मांडलं आहे. बहुतेक मुली भीतीपोटी हा अत्याचार सहन करत आहेत, सासरचे पैसेवाले असले की, माज येतो, असाच आवाज उठवला पाहिजे, हगवणे कुटुंबाला वैष्णवी ताईचा तळतळाट लागेल, हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हाच, या प्रकरणावर चर्चा होऊन समाजात बदल घडायला हवा. अशा अनेक कमेंट नेकऱ्यांनी केल्या आहेत. आता वैष्णवीला योग्य तो न्याय मिळणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.