Priya Marathe Death : अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर अवघी मराठी सिनेसृष्टी हळहळली. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र तिची कर्करोगाशी ही झुंज अपयशी ठरली. वयाच्या ३८व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. कलाविश्वातील अनेक मंडळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करत आहेत. कलाविश्वात प्रिया सगळ्यांची लाडकी होती. तिचा मनमेळाऊ स्वभाव, शांत, संयमी स्वभाव नेहमीच सगळ्यांना भावला. केवळ सिनेविश्वातच नव्हेतर घरच्या मंडळींचीही प्रिया अतिशय लाडकी होती. तिचे दिवंगत सासरे अभिनेते श्रीकांत मोघे यांचा त्यांच्या लाडक्या सूनेवर फार जीव होता.
श्रीकांत मोघे आणि प्रिया यांच्यामध्ये बाप-लेकीचं नातं होतं. २०२१ मध्ये प्रियाचे सासरे आणि अभिनेता शंतनू मोघेचे वडील श्रीकांत मोघे यांचे निधन झाले. तेव्हा प्रियाने एक पोस्ट शेअर करत सासऱ्यांना निरोप दिला होता. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या या पोस्टने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर प्रियाने तिच्या सासऱ्यांसाठी लिहिलेली पोस्ट लक्षवेधी ठरतेय. आणि यावरुन तिचं आणि सासरच्या मंडळींबरोबर असलेलं सुंदर बॉण्डही समोर आलं.
सासऱ्यांच्या निधनानंतर प्रियाने पोस्ट शेअर करत लिहिलं होत की, “माझा बाबा! इतकं प्रेम, माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केलं असेल. ‘सासरे’ फक्त म्हणायला, होता तो मला बाबापेक्षाही जवळचा. ‘माझं पीयूडं’, ‘माझं लाडकं’ अशी हाक मारत दोन्ही हात पसरुन, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की, आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे, असे सगळे प्रश्न विचारायचा”.
पुढे तिने लिहिलं, “बाबा आणि मुलाचं हे असं नातंही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं. गेली काही वर्ष तो व्हीलचेअरवर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली. उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पहिला. “मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे” हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला… पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील”.





