Chiki Chiki BooBoom boom Official Teaser : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने आजवर त्याच्या विनोदी कलेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. विनोदाचं उत्तम टायमिंग सांभाळत प्रसादने रसिक प्रेक्षकांना हसवलं. अभिनयाबरोबरच प्रसादचा दिग्दर्शनातही कल असलेला पाहायला मिळाला. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. यानंतर आता छोटा पडदा गाजवल्यानंतर प्रसाद पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवायला सज्ज होत आहे. या नव्या वर्षात त्याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षाखेरीस याची पहिली झलक प्रसादने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. यानंतर आता चित्रपटाच्या टीझरने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे.
‘चिकी चिकी बुबूम बूम’ असं चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या टिझरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मित्रांची रियुनियन पार्टी आणि या पार्टीदरम्यान झालेला गोंधळ आणखीनच गोंधळवून टाकणारा आहे. टीझरमध्ये कॉलेजनंतर काही मित्र एकत्र भेटायचं ठरवत असल्याचं दिसतं. एका व्हिलावर ही गॅंग भेटायचं ठरवते, मात्र या भेटीनंतर त्या व्हिलामध्ये घडणारे अनेक भयानक प्रसंग या जमलेल्या ग्रुपची कशी तारांबळ करतात हे सारं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी साऱ्यांना चित्रपट पाहावा लागेल.
‘चिकी चिकी बुबूम बूम’ हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रसाद खांडेकरांच्या या नव्या चित्रपटात त्याच्यासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, निखिल रत्नपारखी, प्रियदर्शनी इंदलकर, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, ऐश्वर्या बदाडे, श्याम राजपूत, निखिल बने, प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर, अभिजीत चव्हाण आणि अपर्णा क्षेमकल्याणी हे कलाकार झळकणार आहेत.
आणखी वाचा – घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, तयारीला सुरुवात, तारीखही समोर
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचं लेखन प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर यांचं आहे. याशिवाय या चित्रपटाला रोहन रोहन यांचं संगीत लाभलं आहे.