कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी मैत्रिणींची एक हटके मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली, या मालिकेचे नाव म्हणजे ‘पिंगा गं पोरी पिंगा’. वेगवेगळ्या शहरांतून मायानगरी मुंबईत आलेल्या आणि एका बड्या सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या पाच मुलींभोवती फिरणारं या मालिकेचं कथानक आहे.या मालिकेत ऐश्वर्या शेट्ये, विदिशा म्हसकर, प्राजक्ता परब व शाश्वती पिंपळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत त्या मैत्रिणींचा खास बॉण्ड असल्याचे पाहायला मिळतं. मालिकेत ज्याप्रमाणे या मैत्रीणी एकमेकींच्या मदतीला धावून जातात, तशा त्या खऱ्या आयुष्यातही एकमेकींना मदत करतात आणि याबद्दल त्यांनी नुकताच एक किस्सा सांगितला आहे. (Pinga Ga Pori Pinga serial actresses argument with a taxi driver)
मालिकेच्या सेटवरुन अंधेरी परिसरात येण्यासाठी एका चालकाने त्यांना अधिकचे वेतन सांगितले. यावरून अभिनेत्रींचा त्या चालकाशी वाद झाला. हा नेमका किस्सा काय होता. याबद्दल ऐश्वर्या शेट्ये, विदिशा, प्राजक्ता व शाश्वती यांनी इट्स मज्जाशी संवाद साधताना सांगितलं. याबद्दल बोलताना आकांक्षा असं म्हणाली की, “यांनी गाडी बुक केली आणि इथून Uber मिळवणं खूप अवघड होतं. कारण इथे येणारा रस्ता थोडा अंधारलेला आणि आतमध्ये आहे. पण तो आला आणि थांबला. मग त्याने थोडं आगाऊ शब्दांत यांना काही तरी म्हटलं”.
पुढे याच किस्स्याबद्दल प्राजक्ता परब म्हणाली की, “त्याने शिवीगाळच केली. त्याने आमची Uber कॅन्सल केली. त्यानंतर त्याने अंधेरीला जाण्याचे थोडे जास्तीचे पैसे सांगितले. त्यामुळे आम्ही रागाने उतरलो आणि उतरताना मी गाडीचा दरवाजा थोड्या जोराने बंद केला. यावर तो लगेच बाहेर आला आणि त्याने धमकी देण्यास सुरुवात केली आणि तो आता बघा मी काय करतो असं म्हणाला”.
यानंतर विदिशाने असं सांगितलं की, “तो आमच्यावर जोरात ओरडला की, तुम्ही माझ्या गाडीचा दरवाजा जोरात का बंद केला. आता मी तुम्हाला दाखवतो आणि फोनमध्ये बघायला लागला. यानंतर मी त्याला म्हटलं की, तू आमच्याच इथे येऊन आम्हाला ही बोलतो आहेस. त्यानंतर मी लगेच प्रोडक्शनमध्ये फोन केला आणि सगळं सांगितलं. मग सगळे खाली आले. त्याला तुडवण्याच्या बेतात होते. त्यावेळी एक-दोन फटकेही खाल्ले”.