पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. माहिरा खानने आजवर पाकिस्तानी शोसह बॉलिवूडमध्येही काम केले आहे. सिनेसृष्टीत काम करत असताना अभिनेत्रीने तिच्या व्यवसाय व वैयक्तिक आयुष्यात चांगला समतोल राखला आहे. काही दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये तिने सलीम करीमसह दुसरे लग्न केले. अभिनेत्री तिच्या दुसऱ्या लग्नानंतर बरीच चर्चेत आली. काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या चर्चांवर आता अभिनेत्रीने प्रतिक्रिया देत मौन सोडले आहे. (Mahira Khan On Pregnancy)
माहिरा म्हणाली, “मी प्रेग्नंट नाही. ही केवळ अफवा आहे. ही खोटी माहिती कुठून येत आहे हे मला माहीत नाही. माझे वजन वाढले आहे म्हणून कदाचित ही बातमी पसरली असावी”. सध्या माहिरा खान तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. तिने पेशाने व्यावसायिक असणाऱ्या सलीम करीमसह लग्न केले आहे. सलीम व माहिराच्या लग्नाची खूप चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो बरेच व्हायरल झाले होते. सलीमच्या आधी माहिराचे लग्न अली अस्करीसह झाले होते. अलीबरोबरच्या लग्नातून माहिराला एक मुलगाही आहे.
माहिराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०१७ मध्ये अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘रईस’ या चित्रपटात ती शाहरुख खानसह दिसली होती. मात्र हा चित्रपट तितका चालला नाही. माहिरा ही पाकिस्तानचा लोकप्रिय चेहरा आहे. तिचे ‘हमसफर’, ‘सडके तुम्हारे’ हे शो प्रचंड गाजले. माहिराच्या ‘हमसफर’ या शोची भारतातही खूप चर्चा रंगली.
माहिरा ‘नियात’, ‘शहर-ए-जात’, ‘बिन रोये’, ‘मैं मंटो’, ‘हम कहाँ के सच्चे’ आणि ‘रझिया’ यांसारख्या शोमध्ये दिसली आहे. तर ‘बल’, ‘हो मन जहाँ’, ‘वेरना’, ‘७ दिन मोहब्बत’, ‘सुपरस्टार’ या पाकिस्तानी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. आता ती ‘निलोफर’ चित्रपटात दिसणार असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटात ती नीलोफरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.