Oscar 2024 : क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपेनहायमर’ने ऑस्कर २०२४मध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये १३ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते, त्यापैकी ७ पुरस्कारांवर या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे स्कोअर, सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या पुरस्कारांवर नाव कोरले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाची क्रेझ होती आणि ऑस्कर जिंकल्यानंतर लोकांमध्ये याबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली असल्याचं पाहायला मिळतंय.
‘ओपेनहायमर’ हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला विसरला असाल वा पाहायचा राहून गेला असेल तर तुम्ही घरी बसून OTT वर त्याचा आनंद घेऊ शकता. या वर्षीचा सर्वात जास्त ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट ‘Openheimer’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर मिळेल हे जाणून घेऊया. २०२३ मध्ये ऑस्कर विजेता चित्रपट ‘ओपनहायमर’ प्रदर्शित झाला. हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर जगभरात या चित्रपटाने खळबळ उडवून दिली. या चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने तब्बल ९५० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.
‘ओपेनहायमर’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी, OTT प्लॅटफॉर्म ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहण्यासाठी यूजर्सना १४९ रुपये खर्च करावे लागले. मात्र आता चाहत्यांना या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मोफत आनंद घेता येणार आहे.’Openheimer ‘ हा चित्रपट २१ मार्चला OTT प्लॅटफॉर्म Jio Cinemaवर मोफत पाहता येणार आहे. याशिवाय ऍपल या ऍपवरही हा चित्रपट पैसे भरुन पाहू शकता.
‘ओपेनहायमर’ हा चित्रपट गेल्या वर्षी २१ जुलै २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सिलियन मर्फीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी जूनियर, फ्लॉरेन्स पग यांच्यासह इतर अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलन यांनी केले आहे. चित्रपटाची कथा अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे.