आई-वडिलांबरोबर मुलं खेळत होती, कोणी सेल्फी काढत होतं, कोणी गरम गरम मॅगी तर कोणी भेळ खात होतं, कोणी हनिमूनला आलेलं जोडपं आयुष्याभराची स्वप्न रंगवत होतं. हे सगळंच्या सगळं धुळीला मिळालं ते दहशतवाद्यांमुळे… ठिकाण होतं पहलगाम. गोळीबाराचा आवाज सुरु झाला आणि पर्यटकांना काही कळायच्या आतच त्यांचं जीवन संपवण्यात आलं. कोणाच्या छातीवर, कोणाच्या पोटात तर कोणाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. निष्पाप जीव रक्ताच्या थारोळ्यात लोळत राहिले. उघडल्या डोळ्यांनी अनेक कुटुंबांनी मृत्यूचा तांडव पाहिला. यातीलच एक घटना म्हणजे २६ वर्षांच्या नौदल अधिकारी विनय नरवालचा मृत्यू. पत्नी हिमांशीसह हनिमूनला आले ते पुन्हा परतलेच नाही. (vinay narwal father video)
विनय यांच्या कुटुंबाने त्यांचं पार्थिव पाहताच केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. काय काय म्हणत असेल त्यांचा जीव. हिमांशी व विनयचं लग्न होऊन तर अवघे सात दिवसच झाले होते. नववधूच्या हाती तसाच चुडा होता, मेहंदीही उतरली नव्हती आणि पतीचा मृतदेह पाहण्याची वेळ तिच्यावर आली. सुखी संसाराची कैक स्वप्न पहलगामच्या त्या जागेतच गाढली गेली. विनय यांचं पार्थिव आणल्यानंतर हिमांशी त्यांच्या डोक्यावर सतत हात फिरवत होती. एकटक त्यांच्याकडे बघत होती. एकत्र घालवलेले काही मोजकेच क्षण हिमांशीच्या मनात, विचारात तेव्हा असावेत बहुदा…
विनय यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार पार पडल्यानंतर त्यांच्या अस्थि हरिद्वारमधील पौडी गंगामध्ये विर्सजित करण्यात आल्या. विनय यांच्या वडिलांनी लेकाचं हे कार्य पूर्ण केलं. मात्र अस्थि विर्सजीत करताना विनय यांच्या वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. ते जोरजोरात रडू लागले. तरुण मुलाला गमावणं एका वडिलांसाठी किती मोठं दुःख असू शकतं ही जाणीव यावेळी झाली. गंगेमध्ये अस्थि विर्सजित करता त्यांनी मोठा हंबरडा फोडला.
विनय यांच्या वडिलांना उभंही राहताना येईना. लेक परत येईल का? या एकाच प्रश्नाने ते रडत राहिले. त्यांचं संपूर्ण जगच त्यावेळी संपलं होतं. नातेवाईकांनी त्यांना सावरलं. गंगेमधून बाहेर येत त्यांनी स्वतःच्या मनाला स्वतःच समजावलं. हिंमतीने पुढे आले आणि म्हणाले, “संपूर्ण देशाचा मी आभारी आहे. हा दुःखद प्रसंगी सगळे माझ्याबरोबर उभे आहेत. माझ्या कुटुंबियांच्या पाठिशी उभे आहेत. घडलेल्या घटनेबाबत मी काहीच बोलू शकत नाही”. वडिलांचं आभाळाएवढं दुःख पाहून काय बोलणार?… फक्त हात जोडून तुम्हाला मनापासून नमस्कार आणि दुःख सहन करण्याची ताकद मिळो बस्स…