पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. सरकार नक्की काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष असताना महत्त्वपूर्ण घडामोडी घडत गेल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. आता तर भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव आणखीनच वाढला आहे. युद्धाच्या दिशेने वाटचाल असल्याची चिन्ह दिसत आहेत. जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तानच्या इतर नियंत्रण रेषेजवळ वातावरण तापलं आहे. हवाई हल्ल्यांद्वारे दोन्ही देशांकडून एकमेकांना प्रत्युत्तर देण्याची मालिका सुरुच आहे. अशातच आता पाकिस्तानी अँकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अँकरने स्वतःच्याच देशातील सेलिब्रिटींना दोष दिला आहे. तसेच कॅमेऱ्यासमोरच रडली आहे. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. (Pakistani Anchor Viral Video)
भारत व पाकिस्तानमधील तणावाबाबत पाकिस्तानी अँकर बोलताना दिसत आहे. यावेळी पाकिस्तानी सेलिब्रिटींविषयी ती बोलली. त्यानंतर सैन्यात असलेल्या जवानांबाबत बोलताना ती रडली. अँकर म्हणाली, “तुम्ही सगळे बेशरम आहात. या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या देशाच्या बाजूने उभेही राहू शकत नाहीत. तुम्हाला तुमचे फॉलोअर्स, लाइक्स व व्ह्युजचीच पडली आहे. लाज वाटते तुमची. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही कुठे आहात?. भारताच्या फॅन्सच्या बाजूने हे उभे आहेत. आमचे फॉलोवर्स नाही आले, व्ह्युज नाही आले हे विचार करत बसले आहेत. लाज वाटते. जा जाऊन सीमेवर उभे राहा. जाऊन तिथे युद्ध करा ना…”
पुढे ती ओरडत म्हणाली, “तुमच्या देशाला तुम्ही काय देता?, देशासाठी काय करता?. पाठिंबा तुम्ही दिलाच नाही. ते सैनिक आपल्यासाठी जीव देत आहेत. सैनिक शांत बसूही शकत नाहीत, शांतपणे झोपू शकत नाहीत. आपला देश वाचवण्यासाठी जमिन, आकाश, समुद्राद्वारे लक्ष ठेवत आहेत. सैनिक गोळ्या सहन करतील. पण तुम्ही काय करता?. हे आपले सेलिब्रिटी आहेत त्यांना आपण डोक्यावर बसवून ठेवलं आहे. एक स्टेटस ठेवण्यासाठी, बोलण्यासाठी यांचा जीव थोडी जाणार आहे”.
पाहा व्हिडीओ
Pakistani humour turns into crying 🤣 pic.twitter.com/BTHAOGdYoq
— खुरपेंच (@khurpenchh) May 8, 2025
आक्रोश करत, ओरडत बोलताना अँकरला यावेळी रडूही कोसळलं. हा सगळा ड्रामा आणि १०० टक्के नाटक असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्यासाठी ती रडायला लागली. याचंच अनेकांना नवल वाटलं. @khurpenchh नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अरे दीदी घाबरु नको अजून रडणं बाकी आहे, पाकिस्तानचे आणखी वाईट दिवस येणार, पाकिस्तानी कलाकारांपेक्षाही चांगला अभिनय ही करते अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.