पहलगाम हल्ल्यानंतर सरकार कोणतं ठोस पाऊल उलचणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेरीस ६ मेच्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई केली. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ दशहतवादी तळांवर भारतीय लष्कराने हवाई हल्ला केला. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकमध्ये तणाव आणखी वाढला आहे. पाकिस्तान सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील गावांजवळ गोळीबार केला. यामध्ये पूंछ जिल्ह्यातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या गोळीबारात आतापर्यंत १५ जण ठार तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये मुलांचाही समावेश आहे. दरम्यान याबाबत आता देशभर संताप व्यक्त होत आहे. (Firing by Pakistan civilians killed)
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा आम्ही हिशोब करु अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत. असं असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रम सीमेजवळील गावांमध्ये झालेला गोळीबार हृदय पिळवटून टाकणारा आहे. यामध्ये पुन्हा एकदा भारतातील निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतच सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपलं मत मांडलं आहे. तसेच निष्पाप बळी गेले हे पाहून तिलाही दुःख अनावर झालं आहे.
तेजस्विनी म्हणाली, “हे काय चाललंय पूंछ?. निरपराध लोकांचे जीव जात आहेत. हे सगळं थांबायला हवं. निशब्द”. तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. तसेच मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाविरोधात मोठं पाऊल उचललं. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर वातावरण आणखी चिघळलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर युद्धाचं सावट आलं तर काय करावं? याचंही देशभर प्रशिक्षण सुरु आहे.

दोन देशांमध्ये सुरु असलेला तणाव थांबणार का?, आणखी पाकिस्तान काही टोकाचं पाऊल उचलणार का?,की खरंच युद्धाला सुरुवात होणार? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात आहेत. एकीकडे भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या तणाबाबत कलाक्षेत्रातून देशाला पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे भारतात काम केलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोध दर्शवला. मात्र आता पाकिस्तानने निष्पाप लोकांवर केलेल्या गोळीबारावर पाकिस्तानी कलाकार गप्प का? हा प्रश्न समोर आहे.