मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे निवेदिता सराफ आणि अशोक सराफ. अशोक मामा आणि निवेदिता ताई या जोडी बदल बोलावं तेवढं थोडंच आहे. आपल्या अभिनय कौशल्याने खूप मोठा काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एका पेक्षा एक चित्रपट, मालिका, नाटक त्यांनी कलाविश्वाला दिले आहेत. त्यांच्या कामाबरोबरच एक आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सिनेसृष्टीत ही जोडी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही निवेदिता या बऱ्यापैकी सक्रिय असतात. निवेदिता यांनी नुकतीच शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये निवेदिता, अशोक सराफ हे त्यांच्या लेकाबरोबर दिसत आहेत. (Nivedita Saraf Post)
अनेक कलाकारांची मुलं आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ सिनेविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला हे गृहीत धरलं जात की, अभिनेत्यांची मुलं अभिनेता किंवा अभिनेत्रीच होणार. परंतु काहींजण या गोष्टीला अपवाद असतात. आई- वडील दोघेही अभिनय क्षेत्रात असून अनिकेतने मात्र वेगळे क्षेत्र निवडले. शेफ होण्यासाठीची त्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे . घरात अभिनयाचा वारसा असताना वेगळी वाट निवडण्याची हिंमत त्याने दाखवली.
आणखी वाचा – Video : वाढदिवसाला क्रांती रेडकरला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, मंदिरातही गेले अन्…; व्हिडीओही केला शेअर
अनिकेतने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ देखील आहेत. पॅरिस येथे अनिकेत असून आता निवेदिता सराफ व अशोक सराफ हे दोघेही लेकाला भेटायला परदेशात पोहोचले आहेत.
“अखेर चार वर्षांनी आम्ही एकत्र आहोत”, असं कॅप्शन देत निवेदिता सराफ यांनी एकत्र फोटो शेअर केला आहे. निवेदिता व अशोक सराफ यांना बरेचदा कामानिमित्त त्यांच्या लेकाला भेटता येत नाही. मात्र आता अखेर चार वर्षांनी हे सराफ कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर हे सराफ कुटुंब परदेशात एकत्र सुट्टीचा एन्जॉयही करत आहेत.