नीता मुकेश अंबानी यांचं कल्चरल सेंटर हे भारतातील भव्य कल्चरल सेंटरपैकी एक आहे. ‘एनएमएसीसी’ला ३१ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण झालं. एक वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून एनएमएसीसीमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मराठमोळ्या गायक संगीतकारांची जोडी अजय-अतुल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी या जोडीने खास सादरीकरण केलं. यावेळी अजय-अतुलने गायलेल्या गाण्यांनी सर्वांचीच मनं जिंकली. (Nita Ambani At NMACC)
NMACC च्या संस्थापक नीता अंबानी यांनी #OneYearAtNMACC सोहळ्यासाठी आयोजित कार्यक्रमात साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात नीता अंबानी यांच्या खास मराठमोळ्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. शिवाय त्यांनी मराठीतून प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी हाताने विणलेली निळ्या रंगाची सुंदर अशी मराठमोळी पैठणी नेसली होती. जरीचा काठ असलेल्या या पैठणीवरील फुलं आणि मोराच्या डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधलं. कपाळावर चंद्रकोर लावून त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. तर या मराठमोळ्या साडीवर घातलेल्या दागिन्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं.
मराठमोळ्या पेहरावात नीता अंबानी यांनी मराठीत केलेल्या संवादाने साऱ्यांचं लक्ष वेधलं. “आपल्या देशाचे आणि संस्कृतीचे नाव संपूर्ण जगात उज्वल व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही आहात म्हणूनच या सर्व कला जिवंत आहेत, तुम्ही आहात म्हणून भारतीय संस्कृतीचा वारसा जिवंत आहे,आणि तुम्ही आहात म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे”, असं नीता अंबानी या कार्यक्रमात प्रेक्षकांना मराठीत म्हणाल्या.
या ग्रँड सोहळ्यात अजय-अतुल यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी साऱ्यांची मनं जिंकली. कार्यक्रमात उपस्थित त्यांच्या गाण्यांवर थिरकतानाही दिसले. दोघांचं कौतुक करत नीता अंबानी म्हणाल्या, “हे दोघे भाऊ संगीत वेडाने झपाटलेले आहेत, मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे म्हणून मला माहित आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही तर खूप चांगले व्यक्तीही आहेत”.