‘बिगबॉस मराठी’ सुरु झालं असून या शोमध्ये अरबाज पटेलने अगदी पहिल्या दिवसापासूनच सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाज त्याच्या ताकदीच्या जोरावर खेळताना दिसत आहे. अनेकांना हे आवडत आहे तर काहींना हे पटत नाही आहे. ‘बिगबॉस’च्या आधी अरबाज MTVच्या ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमात तो इतर स्पर्धकांना चुरशीची टक्कर देताना दिसला. या कार्यक्रमात तो नायरा आहुजासह कनेक्शनमध्ये होता. शो संपल्यानंतर नायरा अहुजानं अरबाजवर फसवल्याचा आरोप केला. (Arbaz patel Love life)
स्प्लिट्सविला या शोमध्ये येण्यापूर्वी तो लीझा बिंद्राला डेट करत होता, असं नायरानं म्हटलं. सोशल मीडियावरही अरबाज व लिझा यांचे अनेक रोमँटिक फोटो पाहायला मिळतात. नुकताच नायराने the leen guy show या मुलाखतीत भाष्य केलं आहे. नायराला अरबाजबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देत नायरा म्हणाली, “ही खूप मोठी गोष्ट आहे. पण फार कमी वेळात प्रेम होऊ शकत नाही हे ही तितकंच खरं आहे. तो माझ्यासाठी खूप काही करायचा त्यामुळे कधी कधी मलाच असं वाटायचं की मी अरबाज साठी काहीच करत नाही आहे. माझ्या भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे मी हे प्रेम वा अरबाजला मान्य करायला तयार नव्हते. पण त्याच्या मनात माझ्यासाठीची भावना पाहून मी होकार दिला. आणि ही माझ्या आयुष्यातील आणखी एक मोठी चूक ठरली”.
पुढे ती असंही म्हणाली की, “आमच्या जाती पण वेगळ्या असल्याने आणि आमचं भविष्य एकत्र पुढे जाऊ शकत नसल्याने आम्ही यातून बाहेर पाडण्याचं ठरवलं. मला सुरुवातीला त्या मुलीबाबत काहीच माहित नव्हतं. त्या दोघांचा साखरपुडा झाला आहे. मी जितकी माहिती मिळवली त्यावरुन ती मुलगी त्याच्याबरोबर पाच वर्षांपासून आहे. आणि ती सर्वत्र पोस्ट करताना तो तिच्याशी किती खरा आहे याबाबत सांगताना दिसते. शोमध्ये तो माझ्याशी जे वागला ते स्क्रिप्टेड होतं असं अनेकांचं म्हणणं आहे पण हा शो स्क्रिप्टेड नसतो. तो जे काही वागला ते कुठेच लिहून दिलं जात नाही. त्याने मला इतकं महत्त्व दिलं की माझ्या ध्यानीमनी पण नाही आलं की याचा साखरपुडा झाला असेल. ती मुलगी पोस्ट शेअर करत असायची आणि आलेल्या कमेंटवर उत्तर पण द्यायची. अनेकांनी तिला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यावर तिने आभारही मानले”.
यापुढे अरबाज व त्याच्या खऱ्या आयुष्यातील मौत्रिणीबाबत म्हणजे लिझाबाबतही भाष्य केलं. नायरा म्हणाली, “मी खात्रीशीर सांगू शकत नाही की, त्या दोघांचं लग्न झालं आहे की नाही. पण त्या मुलीच्या हातात साखरपुड्याची अंगठी असलेली पोस्ट तिने शेअर केली होती यावरुन त्यांचा साखरपुडा झाला आहे एवढं नक्की. ती मुलगी कायम अरबाजबद्दल चांगलं बोलत असते. तो तिच्याशी खरा आहे. मुळात ती दुबईला राहत असल्याने भारतातील शो तिथे पाहिले जात नाहीत, त्यामुळे तिला अरबाजचं वागणं माहित नसावं”.