महाराष्ट्रातील लाखो वहिनींचा हक्काचा व लोकप्रिय कार्यक्रम म्हणजेच ‘होम मिनिस्टर’. या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने तब्बल २० वर्षे पूर्ण केली आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत महाराष्ट्रातील तमाम वहिनींना बोलतं केलं. त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळत बक्षिसांच्या रुपात वहिनींचा सन्मान केला. आदेश बांदेकर उर्फ भावोजींच्या हस्ते मिळालेली पैठणी ही या कार्यक्रमाची आकर्षणाची बाब आहे. “बांदेकर पैठणी घेऊन आले हो”, हे वाक्य प्रत्येक महिलेला प्रिय आहे. केवळ समस्त महिलावर्ग नव्हे तर अभिनेत्रींनाही बांदेकरांच्या पैठणीची ओढ आहे. (bhumija patil won home minister paithani)
२० वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता या कार्यक्रमाने थांबा घेतला आहे. ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा शेवट होताना ‘झी मराठी’ वाहिनीने ‘उत्सव बाप्पाचा खेळ होम मिनिस्टरचा’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ‘झी मराठी’च्या मालिकेतील नायिका ‘होम मिनिस्टर’चा खेळ खेळताना पाहायला मिळाल्या. यामध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने बाजी मारली. आणि अभिनेत्रीला सव्वा लाखाची पैठणी मिळाली. याचा अनुभव तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेत एजे व लीला यांचा अनोखा प्रवास पाहायला मिळत आहे. या मालिकेत एजेंच्या तीन सूनांचीही विशेष भूमिका पाहायला मिळत आहे. अशातच या तीन सूनांपैकी एकाने या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या मानाच्या पैठणीवर नाव कोरलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे नवरी मिळे हिटलरला मालिकेतील सरस्वती म्हणजेच भुमीजा पाटील.
आणखी वाचा – लवकरच नव्या घरात राहायला जाणार अंशुमन विचारे, पहिल्यांदाच दाखवले inside photo , व्हिडीओ समोर
यावेळचा व्हिडीओ भूमिजाने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “होय ती सव्वा लाखाची पैठणी मला मिळाली. लहानपणापासून माझी इच्छा होती की कधीतरी ‘होम मिनिस्टर’मध्ये जावं आणि मग मलाही आदेश भाऊजींच्या हस्ते पैठणी साडी मिळेल. Manifest करणं म्हणतात ते हेच असावं. जेव्हा मी पैठणीचा खेळ खेळले तेव्हा अजिबात असं डोक्यात नव्हतं की आपण जिंकावं”. पुढे ती म्हणाली, “मला ‘होम मिनिस्टर’ मध्ये भाग घेता आला त्यातच मी खुश होते पण माझे सहकलाकार म्हणजेच ‘नवरी मिळे हिटलरला’ ही टीम माझ्या बरोबर होती. मला प्रोत्साहन करत होती. त्यांनी मला विश्वास दिला की, ही पैठणी तुझीच आहे आणि ही पैठणी तुलाच मिळणार. आणि ते खरं झालं ती सव्वा लाखाची पैठणी माझी झाली. ही संधी मला ‘झी मराठी’मुळे मिळाली”.