मराठी मनोरंजन विश्वातील बरेच असे चित्रपट आहेत जे चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्ष झाली असली तरी त्यांची जागा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या हिट चित्रपटांमधील कलाकार, कथानक हे प्रेक्षकांच्या मनात घर करुन असतात. अशातच एका लोकप्रिय मराठी चित्रपटाने मोठ्या पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’. २००४ मध्ये दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. (Navra Maza Navsacha 2 Shooting)
या चित्रपटाने जवळपास दोन दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा करत शुटींगचा श्रीगणेशा झाला. तब्बल १९ वर्षांनी निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पहिल्या भागात कोकणातील शूटिंग पाहायला मिळालं.

पहिल्या भागात कोकणातील गणपती पुळे येथील शूटिंग पाहायला मिळालं. यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही सुरुवात झाली आहे. चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन शुटिंगसाठीच्या प्रवासाची झलक शेअर केली आहे. सर्व कलाकार कोकणात शूटिंगसाठी रवाना झालेले पाहायला मिळत आहेत. स्वप्नील जोशी, हेमल इंगळे हे कलाकार दुसऱ्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
स्वप्नील जोशी, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, हेमल इंगळे ही कलाकार मंडळी एकत्र रेल्वे प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. “चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २’”, असं कॅप्शन स्वप्नील जोशीने या फोटोला दिलं आहे. यावरुन ही मंडळी कोकणात शूटिंगसाठी जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.