८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांच्या पोटी मुलीचा 0जन्म झाला. आई-बाबा झाली असल्याची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली आहे. बाळाच्या जन्मानंतर दीपिका-रणवीरला त्यांचे कुटुंब, इंडस्ट्रीतील मित्र आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच आता जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी देखील दीपिका पदुकोणच्या मुलीला पाहण्यासाठी आणि या जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः रुग्णालयात पोहोचले. मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Deepika Padukone And Ranveer Singh baby)
दीपिकाला दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर दिसत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण टीमसह एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अंबानींची सोन्याच्या रंगाची गाडी आधी जाते आणि त्यांच्या मागे अनेक वाहनांचा ताफा जाताना दिसत आहे. रणवीर व दीपिका यांचे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर चांगले संबंध आहेत. रणवीर व दीपिका मुकेश अंबानींच्या घरी आयोजित केलेल्या प्रत्येक खास सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. त्यांच्या घरी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रंग भरणे असो किंवा रंगमंचावर परफॉर्मन्स दाखवणे असो, हे कलाकार कधीच मागे राहत नाहीत.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या नुकत्याच पार पडलेल्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये गरोदर दीपिकाने रणवीरबरोबर स्टेजवर डान्सही केला. याआधी रणवीरची बहीण रितिका भवनानीही बाळाला व दीपिकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. दीपिका व रणवीरने अद्याप त्यांच्या मुलीच्या नावाबाबत काहीही जाहीर केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर अनेकजण मुलीचे नाव घेऊन चर्चा करताना दिसत आहेत.
रणवीर सध्या वडील झाल्याने लेकीची सेवा करण्यात व्यस्त आहे. आता काही महिन्यांनंतर रणवीर व दीपिका दोघेही या दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहेत. दीपिका शेवटची ‘कल्की 2898 एडी’ मध्ये दिसली होती आणि या चित्रपटातही तिने गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती, त्यानंतर चित्रपटात दिसलेली तिची प्रेग्नन्सी खरी असल्याचे सांगण्यात आले. ‘सिंघम अगेन’नंतर रणवीर सिंग ‘डॉन ३’वर काम सुरु करणार आहे. याशिवाय रणवीर आदित्य धरच्या पुढील चित्रपटातही दिसणार आहे.