मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट असे आहेत ज्यांनी आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘झपाटलेला’. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात जीवंत आहे. या चित्रपटातील ‘तात्या विंचू’ हे पात्र सर्वांच्याच आवडीचे आहे. तात्या विंचू हे पात्र आज ३० वर्ष पूर्ण झाले तरीही कोणीही विसरू शकले नाही. २०१३ साली या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अशातच आता नवीन भाग पुन्हा एकदा येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. (zapatlela movie poster release)
लोकप्रिय अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका असणारा ‘झपाटलेला’ या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे व लक्ष्मीकांत यांच्या जुगलबंदीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. आता ३० वर्षांनी ‘झपाटलेला’चा पुढचा भाग प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. त्याबद्दल अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या सोशल मीडियावरुन पुढील भागाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.
हे पोस्टर शेअर करत त्याने, “हो, हे बरोबर आहे. तात्या विंचू परत येत आहे. २०२५ मध्ये चित्रपटगृहात. ओम फट स्वाहा!!!”, असे लिहीले आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टरवर तात्या विंचू व आदिनाथ यांचे अर्धे अर्धे चेहरे दाखवण्यात आले आहेत. तसेच त्यावर ‘झपाटलेला मी तात्या विंचू’ असे लिहिलेले दिसत आहे.
त्याच्या या पोस्टरमुळे चाहत्यांना खूप आनंद झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “छान. पहिला भाग हा अजरामर आहे. हा भागदेखील तसाच असेल”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “आम्ही खूप वाट बघत आहोत”, तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “अभिनय बेर्डेदेखील या चित्रपटाचा भाग असणार आहे का?”, तसेच अजून एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “आम्हाला तिसऱ्या भागाकडून खूप अपेक्षा आहेत.
महेश कोठारे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून रजनीश खनुजा व महेश कोठारे निर्माते आहेत. आदिनाथ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करणार असून त्यामध्ये इतर कोणते कलाकार दिसणार आहेत याबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.