मेंढरं राखणाऱ्याचा पोरगा मोठा साहेब झाला अन् संपूर्ण राज्यानेच त्याला डोक्यावर उचलून धरलं. त्या आई-बापाचं मन आनंदाने आज काय काय बोलत असेल हो… मेंढपाळाचा लेक बिरदेव ढोणे IPS अधिकारी झाला. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रसह, सोशल मीडियावरही IPS बिरदेवची चर्चा सुरु आहे. दिवसभर मेंढ्या राखत फिरण्यात बिरदेवचं बालपण गेलं. आर्थिक स्थिरता नसतानाही आई-वडीलांसह भावंडांनी दिलेली साथ आज यशाच्या शिखरावर येऊन पोहोचली. याच यशाचे आनंदाने गोडवे गाताना बिरदेवच्या डोळ्यांत पाणी आलं. घरच्यांनाही काय तो आनंद… काय करावं आणि काय नाही म्हणत लेकाचं जंगी स्वागत केलं. संपूर्ण गावच या IPS च्या स्वागतामध्ये दंग झाला. बिरदेवने त्याचा इथवर पोहोचण्यापर्यंतचा संर्घष सांगितला आहे. (middle class birdev done crack UPSC)
२०२२मध्ये आयपीएस बिरदेव डोणे याने पहिली युपीएससी परीक्षा दिली. पण या परीक्षेमध्ये तो पास झाला नाही. त्यानंतरच्या काळात त्याने अभ्यास, मेहनत सुरुच ठेवली. युपीएससीसाठी तयारी करत असताना त्याच्या मावशींच निधन झालं. काही महिन्यांच्या फरकाने आजीचं निधन झालं. मात्र अभ्यासासाठी घरापासून लांब राहणाऱ्या बिरदेवला दोघींच्याही अत्यंसंस्काराला जाता आलं नाही. अनेक परीक्षा पास करत २० जानेवारीला त्याचा पहिला इंटरव्ह्यु झाला.
बकरं धरुन उभं होतं तेव्हा निकाल लागला
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिरदेव म्हणाला, “आता माझा निकाल जेव्हा लागला तेव्हा मावशीच्या दीरांची बकरी कातरणी सुरु होती. माझा मावस भाऊ बकरं कातरत होता आणि मी धरुन उभा होतो. तिथेच असताना माझ्या मित्राचा फोन आला. तो मला म्हणाला तुझी निवड झाली आहे. ५५१ रँक आला आहे. त्या भावना खूप छान होत्या. दोन-तीन मिनीटांसाठी आनंदाश्रू तर येतातच. लिस्टमध्ये येणं खूप मोठी गोष्ट असते. अनेक फोन मला येऊ लागले. त्यानंतर जाणीव झाली की, खूप जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर आहेत”.
घरातील आर्थिक परिस्थिती
“माझे आई-वडील दोघंही मेंढपाळ आहेत. आम्ही भावंडं लहान असेपर्यंत बेळगावमध्ये माझ्या मामासह बकरी राखायचे. कधी आम्ही शाळेत गेलोच नाही. पूर्ण वेळ बकरी पाळत असायचो. इतकं काही तेव्हा आम्हाला अभ्यासाचं गांभीर्य नव्हतं. मग शिक्षक वडिलांना बोलावून घ्यायचे. तुमची मुलं हुशार आहेत त्यांना शिक्षण घेऊया. पप्पा पण दहावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांनीही निर्णय घेतला की, आता बकरी बंद करुया आणि गावाकडे जाऊया. बकरी वगैरे काय होतं ते मामांना दिलं आणि आम्ही भावंड, आई-वडील गावाकडे राहायला आलो. बहिणीचं १२वीतच लग्न झालं. तिलाही शिकायची इच्छा होती. पण शिकता नाही आलं याचं वाईट वाटतं”.
आणखी वाचा – “मांसाहार सोडलं, दारू पिणंही बंद केलं अन्…”, माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने घटवलं १८ किलो वजन, काही खास टिप्स
भावाचं स्वप्न अपूर्णच राहिलं
“भावाला माझ्या पीएसआय व्हायचं होतं. पण माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की, त्याने आर्मीमध्ये जावं. त्याने त्याचं स्वप्न बाजूला ठेऊन आर्मीमध्ये गेला. हवाई नौदलात तो आता शिपाई म्हणून भरती झाला आहे. मी आठवी ते बारावी शिकेपर्यंत आमची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती. दादा शिकत होता बाहेर कॉलेजसाठी तेव्हा हॉटेलला वेटरचं काम करायचा. स्वतःचा खर्च काढायचा. मग तोही आर्मीमध्ये नंतर भरती झाला. आमचे आर्थिक दृष्ट्या चांगले दिवस आले. दरम्यान मलाही पोस्टामध्ये भरती होण्याची संधी मिळाली. नेव्हीमध्येही माझी निवड झाली होती. पण मी दोन्ही नोकरी नाकारुन युपीएससीसाठी तयारी केली”.
आता दादाला पीएसआय करणार
“दादानेच मला सांगितलं की, तू सगळं करु शकतो तू नोकरी करु नको. त्याने स्वतःचं स्वप्न बाजूला साकलं होतं. पण आता त्याची सेवानिवृत्ती झाल्यावर मला त्याच्या पीएसआय परीक्षेसाठी मदत करायची आहे”. बिरदेवच्या बहिणीने तर त्याला मिठी मारत आनंद साजरा झाला. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. बिरदेववर फुलांचा वर्षाव होत होता. त्याच्यासाठी व संपूर्ण कुटुंबासाठी हे सगळं स्वप्नवतच होतं.