Vijay Kadam Died : मराठी चित्रपटसृष्टी, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अत्यंत चोखपणे बजावणारे अभिनेते म्हणजे विजय कदम. अगदी बालवयातच लहानसहान विनोदी भूमिका साकारुन त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करुन रंगभूमीवर पदार्पण केले. शालेय व आंतरशालेय एकांकिका, वैयक्तिक अभिनय स्पर्धेत त्यांनी सहभाग घेत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये एक कलाकार म्हणून त्यांच्यावर जडणघडण झाली. येथे शिकत असताना अभिनयाची बाजू त्यांनी समजून घेतली.
त्यांनतर महाविद्यालयीन शिक्षण विजय यांनी रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले. यावेळी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभाग घेत त्यांनी अभिनय सुरुच ठेवला. ‘अपराध कुणाचा’ हे त्यांचं पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते. या नाटकात ते खलनायकाच्या भूमिकेत होते. पुढे ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसह काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला. कमलाकर सारंग यांच्या ‘रथचक्र’ या नाटकाचाही त्यांना भाग होता आलं. यांनतर विजय कदम यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ‘टूर टूर’ या नाटकामुळे. या नाटकाने सुरुवातीचे ४० प्रयोग केवळ रिकाम्या खुर्च्या पाहिल्या आणि त्यानंतर ४१ व्या प्रयोगाला नाटक तुडुंब भरलं.
याशिवाय ‘हाय वदन’, ‘असावे घरटे आपले छान’, ‘पोलीसनामा’, ”कार्टी प्रेमात पडली’, ‘आमचं नाव बाबुराव’, ‘जुगलबंदी’, ‘प्रेम चालू आहे’, ‘देव पावले’, ‘सख्खे शेजारी’ या नाटकांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. १९८६ साली ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकातील अभिनय प्रवासानं त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. विजय कदम व त्यांच्या पत्नी पद्मश्री यांनी मिळून ‘विजयश्री नाट्यसंस्था’ सुरु केली होती. या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरासह कतार, दोहा, दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी यशस्वीपणे केले.
रंगभूमीप्रमाणे विजय कदम यांनी मालिकाविश्वही गाजवले. ‘पार्टनर’, ‘गोटया’, ‘दामिनी’, ‘सोंगाडया बाज्या’, ‘इंद्रधनुष्य’, ‘घडलयं बिघडलयं’, ‘जिंदगी नॉट आऊट’ अशा अनेक मराठी मालिका आणि ‘श्रीमान श्रीमती’, ‘मिसेस माधुरी दिक्षित’, ‘अफलातून’, ‘घर एक मंदिर’ या हिंदी मालिकेतून अभिनयाची छाप सोडली. विजय कदम यांनी अनेक गाजलेल्या जाहिरातीतही अभिनय केला आहे. ‘शाब्बास सुनबाई’, ‘नवऱ्याने सोडली’, ‘इरसाल कार्टी’. ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘आनंदी आनंद’, ‘लगीनघाई’, ‘लेक माझी लाडकी’, ‘हळद रुसली कुंकू हसली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधूनही विजय कदम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज हा अभिनेता आपल्यात नाही. आज १० ऑगस्ट रोजी कर्करोगामुळे विजय कदम यांचे निधन झाले आहे. विजय यांच्या निधनाच्या बातमीनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.