बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून नानाविध भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी गेल्या महिन्यात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. अभिनेते सयाजी शिंदे मनोरंजन क्षेत्रासह गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सयाजी शिंदे यांनी लाखो झाडे लावत सह्याद्री देवराई उभं केलं. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात चर्चाही झाली. मात्र, सामाजिक कार्यानंतर आता सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना त्यांचा हा राजकीय प्रवेश आवडला असला तरी अनेक चाहत्यांना त्यांचा राजकीय प्रवेश आवडला नसून याबद्दल त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. (Sayaji Shinde On Ladki Bahin Yojana)
सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मी राजकारणात आलेलं माझ्या चाहत्यांना आवडलेलं नाही. पण मला त्यांना हे सांगावंसं वाटत आहे की, लांबून बोलण्यापेक्षा आता मी प्रत्यक्षात बघत आहे. निर्णय घेणं आणि खऱ्या गोष्टींपर्यंत पोहोचणं फार अवघड असतं. राजकारणामुळे अनेक नवी लोकं माझ्याशी जोडली गेली आहेत. यामुळे मी जे झाडांसाठी काम करतो त्याला खूप मदत होईल”. यापुढे सयाजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजनाबद्दलही त्यांचे मत मांडलं.
आणखी वाचा – “गेली पाच वर्ष…”, मालिकेला निरोप देताना मधुराणीने अरुंधतीसाठी लिहिलं भावुक पत्र, म्हणाली, “तुझ्यामुळे मला…”
यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “त्यादिवशी मी एके ठिकाणी गेलो होतो. तिथे एका महिलेला मी लाडकी बहीण योजनेबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी आनंदाने माझे लाडक्या बहिणीचे पैसे आले असं सांगितलं. मग त्यांनी मला तुम्ही राजकारणात आहात ना, मग लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? असं विचारलं. त्यावर मी त्यांना म्हटलं की, “असं काही होणार नाही. लोकांना उगाच ही भीती दाखवली जात आहे. पण मला विश्वास आहे की लाडकी बहीण योजना सुरु राहील. लोकांचेच पैसे लोकांना मिळत आहे. त्यामुळे दुर्बल लोकांना याचा फायदा होत आहे. त्यामुळे याचा निवडणुकीला आणि मतदानात फायदा होईल”.
दरम्यान, राज्यात सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार रॅलीमध्ये अनेक सेलिब्रिटींना बोलवण्यात येत आहे. अशातच अजित पवार यांच्या अनेक प्रचाराच्या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे दिसतात.