Tejaswini Lonari wedding : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचं वातावरण रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांचे विवाहसोहळे थाटामाटात पार पडले, तर काही कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत दिसत आहेत. या यादीत आता आणखी एक लोकप्रिय नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी लोणारी. तेजस्विनी लवकरच आयुष्यातील नव्या पर्वात प्रवेश करणार असून तिच्या लग्नाआधीच्या विधींना जोरदार सुरुवात झाली आहे. नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला असून त्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
यानंतर आता तेजस्विनीचा हळद समारंभ देखील पार पडला आणि या कार्यक्रमातील फोटो व्हायरल होताना दिसले. घरच्या घरीच अत्यंत सध्या पद्धतीने तेजस्विनीला हळद लावण्यात आली. पिवळ्या रंगाची साडी, फुलांचे आकर्षक दागिने आणि तेजस्विनीच्या साधेपणातील देखणा लूक पाहताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला. तिच्या या लूकचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. तेजस्विनीच्या घरात आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. तिचे जवळचे मित्र आणि नातेवाईक लग्नाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
तेजस्विनी लोणारीने काही दिवसांपूर्वीच समाधान सरवणकरसह साखरपुडा उरकला. तेव्हापासून तिच्या लग्नाची तारीख नक्की कधी याची चाहते वाट पाहत होते आणि आज ४ तारीखला दत्त जयंतीच्या दिवशी तेजस्विनी आणि समाधान लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर (Shiv Sena Leader Samadhan Saravankar) यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस’ अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजस्विनीनं ऑक्टोबर महिन्यात समाधान यांच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.





