Shivani Sonar Wedding : सध्या मनोरंजन विश्वात एका मागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. तर काहींची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच मालिकाविश्वातील एक कलाकार जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ही कलाकार जोडी म्हणजे शिवानी सोनार व अंबर गणपुळे. प्रेमाची कोणतीही कबुली सोशल मीडियावरुन न देता थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी साऱ्यांना सुखद धक्का दिला. गुढीपाडव्याचं औचित्य साधत शिवानी व अंबरने साखरपुडा समारंभ केला. आता ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने एका पोस्टद्वारे लगीनघाई सुरु झाली असल्याचं सांगितलं आहे.
शिवानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शिवानीने लगीनघाई सुरु झालं असल्याचं म्हटलं आहे. शिवानीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लग्नासाठी दागिन्यांची तयारी सुरु केलेली दिसत आहे. इतकंच नव्हे तर तिने बनवून घेतलेला हा स्पेशल दागिना तिच्या आजीच्या आईकडून आणि आजीकडून मिळालेला आहे. या दागिन्यांची आठवण शेअर करत शिवानीने खास पोस्ट शेअर करत हा दागिना घडवतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे.
हा खास व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “दागिने ही स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्यात जवळची गोष्ट. आणि एखादा दागिना घडवत असताना तो पाहणं याच्यासारखं दुसरं सुख नाही. त्यात नथ म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय पण ही नथ माझ्यासाठी जास्त खास आहे कारण ही नथ माझ्या आजीच्या आईची आहे. जी तिने तिच्या लग्नात घातली आहे. मग माझ्या आजीने तिच्या लग्नात आणि आता मी माझ्या लग्नात ही नथ घालणार. थोडी जुनी झाली होती त्यामुळे नव्याने विणून घ्यावी लागली. आडनाव सोनार असलं तरी आजपर्यंत दागिना घडताना पाहिलं नव्हतं. या निमित्ताने तेही पुर्ण झालं”.
पुढे तिने असं लिहिलं आहे की, “माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल दागिना आहे. कारण अंकईकर आजोबांनी खूप प्रेमाने विणलेली ही नथ आहे. यांत पणजी आजीचे आणि माझ्या आजीचे आशीर्वाद आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही नथ घडत असताना आई ज्या अभिमानाने माझ्याकडे बघत होती ती नजर मी कधीच नाही विसरु शकणार. आई माझ्या कडे अशी बघत होती जणू तिला कोणीतरी बेस्ट आई असा अवॉर्ड दिला आहे. जुने व पारंपरिक दागिने घालून मिरवायची मजा काहीतरी वेगळीच आहे”.