कलाकाराचा हसरा चेहराच नेहमी प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ही मंडळी दिवस-रात्र झटत असतात. मात्र याच हसऱ्या चेहऱ्यामागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. कलाकारांचं खासगी आयुष्य, आजारपण, दुःख गोष्टी अशा कित्येक घटना त्या सुंदर चेहऱ्यामागे लपवून ठेवतात. उद्देश एकच की, मनोरंजन करत राहणं. कित्येकदा काही कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलतात. त्याचवेळी त्यांच्या रंगरंगोटी केलेल्या चेहऱ्यामागचं सत्य कळतं. असंच काहीसं आता सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांच्याबाबत समोर आलं आहे. त्यांनी आजारपणावर मात करत यशस्वीरित्या काम केलं. आजही त्या काही अंशी आजरपणाचा सामना करतात. याचबाबत अश्विनी यांनी भाष्य केलं आहे. (ashwini kalsekar health issue)
जन्मापासूनच एक किडनी
सुलेखा तळवलकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या आजारपणाबाबत सांगितलं. अश्विनी म्हणाल्या, “मी जन्माला आले तेव्हापासून मला एकच किडनी आहे. माझ्या डाव्या बाजूला किडनीच नाही. ती जागा खालीच आहे. मी २५ वर्षांची असताना मला ते कळालं. मला लहानपणापासून याबाबत काहीच माहित नव्हतं. त्याने काही फरक पडत नाही. पण २००७मध्ये आपल्याच एका मराठी डॉक्टरांनी माझ्यावर चुकीचे उपचार केले. मला इन्फेक्शन असताना माझ्यावर चुकीची लेजर प्रोसेस करण्यात आली. २४ तासांच्या आतच माझ्या शरीरामध्ये सगळं पसरलं. त्यादरम्यान मी यमराजाला नमस्कार असं बोलून आले”.
आणखी वाचा – Video : सात मिनिट उशीर, बायको-मुलासह खड्ड्यात लपला, त्याने अल्लाह हू अकबर म्हणताच…; पर्यटक झिपलाईन करताना…
मरणाच्या दारात पोहोचले होते
“डॉक्टरांनीही हार मानली होती. फक्त तुम्ही देवाची प्रार्थना करा असं माझ्या आईला डॉक्टरांनी सांगितलं होतं. इन्फेक्शन इतकं झालं होतं की, दुसरी किडनी ट्रान्सप्लांट करायचाही वेळ डॉक्टरांकडे नव्हता. सहा दिवस मी जागी होते पण काहीही बडबडत होते. माझ्या आयुष्यातील ते सहा दिवस मला अजूनही आठवत नाहीत. अजूनही माझ्या यकृताच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ आहे. म्हणून दोन वर्ष रक्त पातळ होण्यासाठी इंजेक्शन व इतर औषधोपचार घेतले. डॉ. अरुण शाह यांचे आभार मी मानते. कारण त्यांनीच मला दुसरं आयुष्य दिलं”.
पोटावर दोन-दोन इंजेक्शन आणि काम
“सकाळी व रात्री पोटाच्या दोन्ही बाजूला मी इंजेक्शन घेत होते. शिफ्ट संपल्यानंतर दुसरं इंजेक्शन घ्यायचे. काम करत हे सगळं करायचे. रुग्णालयामधूनही मी काम करायला गेले आहे. ‘कसम से’ मालिका तेव्हा मी करत होते. तुम्हाला त्या मालिकेमध्ये माझ्यामधील फरकही दिसेल”.
आणखी वाचा – Video : खांद्यावर पदर, मराठमोळा साज अन्…; कार्तिकी गायकवाडचा भावाच्या लग्नासाठी थाट, गायलं खास गाणं
नवऱ्याची साथ आणि आई होण्याचं अपूर्ण स्वप्न
या सगळ्या आजारपणात अश्विनी यांचं वजनही वाढलं. नेहमी होणारी जिन्स पायांवरती चढत नव्हती. यावेळी कुटुंबाची उत्तम साथ मिळाली. त्या म्हणाल्या, “माझे सासू-सासरे, आई-वडील, नवरा यांनी खूप साथ दिली. मला या सगळ्यामधून बाहेर काढलं. पण मी माझं आयुष्य जगते. मी घरात असते बाहेर जात नाही. माझे दोन कुत्रे आहेत. किडनीमुळेच मी आई होऊ शकले नाही. आम्ही खूप प्रयत्न केले पण शक्य झाले नाही. डॉक्टरांनी मला ते शक्य नाही असं सांगितलं. त्यात माझं वयही निघून गेलं. वय म्हणजे बाळ झाल्यानंतर त्याच्यामागे पळणं वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. आता माझी दोन बाळं आहेत. गब्बर आणि सांबा. ते दोघं माझं जीवन आहेत”. अश्विनी यांनी सुंदर शब्दांत त्यांच्या सुंदर आयुष्याचं वर्णन केलं आहे.