Marathi Actress on atmosphere of the serial : आज असे अनेक कलाकार आहेत जे मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. असं असलं तरी आपली कला जोपासण्यापुढे ते आलेल्या अनेक आव्हानांकडे दुर्लक्ष करतात. असे करण्याला बरीच कारण आहेत. तरी देखील असे अनेक कलाकार आहेत जे काम करता करता घडणाऱ्या चुका ठळक करुन मार्ग मोकळे करण्याकडे अधिक लक्ष देतात. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख. अमृता देशमुख नेहमीच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिली आहे. न पटलेल्या मुद्द्यावर ती कायम सडेतोडपणे भाष्य करते. अशातच अमृताने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मालिकांमधील वातावरणाबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
सध्या अमृता ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेत काम करूनही तेथील वातावरण काहीसं दूषित असल्याचं अमृताने स्पष्टपणे म्हटलं आहे.’सर्व काही’ या यूट्यूब चॅनेलला अमृताने नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अमृताला विचारले गेले की, “तू नाटक व मालिकांमध्येदेखील काम करतेस. तर नाटक, मालिका, सिनेमा यांच्यात नेमका काय फरक आहे?”. त्यावर अमृता म्हणाली, “मला वाटतं की, मालिकांमध्ये एका पॉइंटनंतर खूप मेकॅनिकल पद्धतीने काम होतं. म्हणजे प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं. दिग्दर्शक, निर्माता यांच्यावर प्रेशर असतं. माझी खात्री आहे की, चॅनेलवरही प्रेशर असतं. पण, यातून असं होतंय की, मालिकांचं वातावरण हे आनंद देणारं कमी आणि तणाव निर्माण करणारं जास्त आहे”.
आणखी वाचा – दारू पिते, सिगारेट ओढते…; शिल्पा शेट्टी सून म्हणून नको असा होता सासऱ्यांच्या हट्ट, पती राज कुंद्रा म्हणाला…
यावर आणखी एक प्रश्न मुलाखतदाराने विचारला की, “तणाव निर्माण होतो म्हणजे नेमकं काय होतं?”. तेव्हा अमृता म्हणाली, “दिग्दर्शकाला वाटतं की, त्यांनी एका दिवसात २२ सीन लावलेत. ते कसं पूर्ण करणार आहे? ड्रेसवाल्यांचं असं होतं की, तुम्ही आज सकाळी सांगताय की, आज आपण प्रोमो शूट करणार आहोत आणि तुम्हाला काही सणांचे शूट करायचं आहे. तर, ऐन वेळी मी कसं मॅनेज करू? कलाकारांना असं होतं की, तुम्ही मला शिफ्ट वाढणार आहे, हे अगोदर सांगितलं नाही. मी काही वेगळे प्लॅन केले होते. निर्माता म्हणतो की मी काय करू, मला चॅनेलनं सांगितलं आहे. चॅनेल म्हणतं की, आपण हे करायलाच पाहिजे. कारण त्यांना कळलेले असतं की, दुसऱ्या चॅनेलमध्ये एक महाएपिसोड येतोय. तिथे एक महालग्न होतंय, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. नाही तर मग आपण मागे पडू. तर, या सगळ्यात कलाकार एक छोटं प्यादं असतं”.
शेवटी अमृता म्हणाली, “मला असं वाटतं की, फार कमी वेळा खूप आनंद मिळतो. शेवटी माणसं त्या त्या दिवसातून आनंद शोधून काढतात. कोणी १०० टक्के दुःखी राहू शकत नाही; पण कुठेतरी हे बदलायला पाहिजे. आपण कलेच्या क्षेत्रात आहोत. इतकं रोबोटिक का होत चाललेलं आहे?”. अमृताने मालिकांमधील वातावरणाबाबत कलाकाराची बाजू मांडत स्पष्टपणे भाष्य केलं.





