मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत शिवानी सुर्वे- अजिंक्य ननावरे, तितिक्षा तावडे- सिद्धार्थ बोडके, सुरुची आडारकर- पियुष रानडे, योगिता चव्हाण- सौरभ चौघुले या कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकल्या. कलाकारांच्या या जोड्यांच्या लग्नसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यापाठोपाठ आता आणखी एक कलाकार जोडी विवाहबंधनात अडकली आहे. ‘असे हे कन्यादान’ फेम अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे ही जोडी लग्नबंधनात अडकली. (Amruta Bane and shubhankar ekbote wedding)
बऱ्याच दिवसांपासून अमृता व शुभंकरच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. अमृता व शुभंकरचा पुणेरी थाटात शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमृता बने ही मूळची मुंबईची रहिवासी तर शुभंकर हा अस्सल पुणेरी मुलगा आहे. विशेष म्हणजे तो दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. अश्विनी यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक उत्तम कलाकृती सादर केल्या होत्या. लेकाच्या लग्नात अश्विनी यांची उणीव नक्कीच भासली.

लग्नात अमृता व शुभंकर यांनी पुणेरी पारंपरिक पोशाख परिधान केलेला पाहायला मिळतोय. गुलाबी साडीत अमृताच रूप खुलून आलेलं दिसलं. शुभंकरही पुणेरी फेट्यात अगदी राजबिंडा दिसत होता. तर रिसेप्शनसाठी दोघांनी साऊथ इंडियन लूक केला होता. नववधूवरांच्या साऊथ इंडियन लूकसह उपस्थित नातेवाईक व कुटुंबियांना साऊथ इंडियन लूक केलेला पाहायला मिळाला. दोघेही या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.
अमृता व शुभंकरच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
ही जोडी सन मराठी वाहिनीवरील असे हे कन्यादान या मालिकेत झळकली. या मालिकेत वृंदा व राणाची भूमिका साकारून दोघांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं. मालिकेनंतर आता या जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली आहे. दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.