Aditi Sarangdhar Talk About Health : अभिनेत्री अदिती सारंगधर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक मराठी मालिका, चित्रपट, नाटक करत अदितीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनयामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री तिच्या बोल्ड व बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. इतकंच नाही तर बरेचदा अभिनेत्री न पटणाऱ्या मुद्द्यांवर सोशल मीडियाद्वारे स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते. सोशल मीडियावर कायम सक्रीय राहून ती तिच्याबद्दलची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करते. अशातच आता अदितीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या आजारपणाबद्दल केलेलं भाष्य लक्षवेधी ठरत आहे. कायमच बिनधास्त दिसणारी ही अभिनेत्रीही आजाराच्या संकटातून बाहेर पडली आहे, याबाबत तिने भाष्य केलं आहे.
अदितीने सोनाली खरेच्या ‘World Of Wellness with Sonali Khare’मध्ये तिला झालेल्या ट्युमर या आजाराबद्दल सांगितलं. अदिती म्हणाली, “मला ट्यूमर झाला होता. त्याची शस्त्रक्रिया झाली त्यावेळी त्याच्या मागे असलेली थायरॉईडची गाठ कापली गेली. तेव्हापासून थायरॉईड सुरु झाला. तेव्हा माझा आवाजही गेला होता. हायपोथायरॉईडमध्ये तुमचं वजन पटकन वाढतं आणि सूज येते. त्यामुळे मला वर्षाचे ३६५ दिवस मी काय खाते? हे बघावं लागतं. आठ दिवस मी काही खाल्लं नाही तर फुगते. त्यामुळे मला सकाळी होणारे कपडे कधी कधी संध्याकाळी होत नाहीत”.
आणखी वाचा – मालिकेत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्याचा लाखो रुपयांचा फोन चोरीला, व्हिडीओमध्ये सांगितला संपूर्ण प्रकार
पुढे ती म्हणाली, “आता हे लोकांना खोटं वाटेल. पण ज्यांनी ज्यांनी माझ्या वेशभूषेचं काम केलं आहे तेच म्हणायचे की, ताई काल कपडे होत नव्हते. पण आज सैल होत आहेत किंवा अगदी काल कपडे सैल होत होते, पण आता होतच नाहीत. मला माझ्या आहाराकडे रोज बघावं लागतं. पण कधी कधी याचा कंटाळा येतो. त्यामुळे थोडे दिवस हे बंद करु, असं वाटतं”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री झाली आई, घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो केला शेअर
आजारपणाला त्रासलेल्या अदितीने उदाहरण देत असं म्हटलं की, “म्हणजे आपल्याला कसाऱ्याला जायचं असेल आणि आपण कर्जतच्या ट्रेनमध्ये आलो किंवा कर्जतच्या ट्रेनमधून पुन्हा कसाराच्या ट्रेनमध्ये यायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ या सगळ्यासाठी लागतो. तसं आहे हे. पण आता ठीक आहे”. आता अदितीची तब्येत ठीक असून तिच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचं म्हटलं आहे.