‘मुंबई पुणे मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’, ‘भिकारी’, ‘फुगे’ या सिनेमांमुळे स्वप्नील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. आजवर त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. येत्या काळातही स्वप्नील हटके भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील जोशीच्या आईचा आज ७४वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. (Swapnil Joshi Mother Birthday)
अभिनेता स्वप्नील जोशीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओदेखील शेअर केला आहे. रेडिओला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नीलने आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओत त्याने असं म्हटलं आहे की, “मी Mumma’s Boy आहे. माझ्यासाठी आई माझं जग आहे आणि ती माझी खूप चांगली मैत्रीणही आहे. मला कोणती मुलगी आवडली तर मी तिला हक्काने सांगायचो की, आई बसना तुला काही सांगायचं आहे. आई एकदम बंटाय है होती. अजूनही ती बंटाय आहे. मला वाटतं आई हे एकमेव नातं आहे, जिला एका कॉलवर कळतं की काय र बरा आहेस ना?”
तर या व्हिडीओसह तिने कॅप्शनमध्येही आईला शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने असं म्हटलं आहे की, “७४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझ्या शहाणपणाने आणि प्रेमाने अप्रतिम प्रवासाला आकार दिला आहे यामुळे तुला माझे आयुष्य म्हणायचे भाग्य मिळाले! मला या जगात आणल्याबद्दल आणि माझे सर्व जीवन आनंदाने भरल्याबद्दल धन्यवाद. तुझा दिवस उत्तम आरोग्य, अमर्याद आनंदा आणि तू उदारपणे इतरांबरोबर वाटून घेतलेले प्रेम आणि कुटुंबासाठी एक सुंदर घर बनवलेले जावो. प्रेमाचा वारसा तू निर्माण केला आहेस. तुझ्या अतुलनीय प्रवासासाठी शुभेच्छा”.
दरम्यान, स्वप्नील जोशी लवकरच ‘जिलबी’ नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री शिवानी सुर्वेदेखील असणार आहे. याच चित्रपटात स्वप्नील विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून चाहत्यांना त्याच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.