मराठी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर सध्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याला त्याच्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगवर अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत परखड असं भाष्यही केलं. या ट्रोलिंगमुळे चिन्मयने खूप मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. मुलाच्या नावावरुन ट्रोल होताच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कधीही करणार नसल्याचं जाहीर केलं. (Siddharth Chandekar On chinmay mandalekar)
चिन्मयने “यापुढे मी कधीही महाराजांची भूमिका करणार नाही”, असं वक्तव्य केल्याने सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. अभिनेत्याच्या या निर्णयावर कलाकार मंडळींसह, त्याच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा निर्णय मागे घे’, असं म्हणत अनेक चाहते अभिनेत्याला विनंती करताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकारही चिन्मयच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही संताप व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ चांदेकरने अभिनेत्याला पाठिंबा दर्शवित सोशल मीडियावरुन खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थने असं लिहिलं आहे की, “जहांगीरच्या नावावरुन घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही. आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग”.
पुढे सिद्धार्थने चिन्मयला विनंती करत हा निर्णय न घेण्यास सांगितलं आहे. सिद्धार्थ म्हणाला, “तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केली आहेस आणि कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा आदर करतो. ही भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज. आम्ही सगळे तुझ्या, नेहाच्या आणि जहांगीरच्या बरोबर आहोत”, असं म्हटलं. सिद्धार्थप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी अभिनेत्यासह त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीही सातत्याने चाहत्यांकडून करण्यात येत आहे.