‘हम बने तुम बने’, ‘अजूनही बरसात आहे’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेता संकेत कोर्लेकरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. याशिवाय टकाटक या चित्रपटातून संकेत मोठ्या पडद्यावरही झळकला. सोशल मीडियावरही संकेत बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच संकेतने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. संकेतची ही भावुक पोस्ट चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. (Sanket Korlekar Emotional Post)
संकेत त्याच्या आईबरोबर शेअर केलेल्या क्षणांचा एक व्हिडीओ बनवून तो शेअर केला आहे. या व्हिडीओसह कॅप्शन देत त्याने असं म्हटलं आहे की, “आई आज तुझा वाढदिवस. गेल्या १० वर्षात तुझ्यावरचं प्रेम १००० पट वाढलं आहे. त्याआधी तुला मी देव समजेन इतके प्रेम नव्हते कारण तू केलेल्या त्यागाची किंमत कळण्याइतपत माझी लायकी नव्हती. मला नोकरी करायची नव्हती छोट्याश्या गावातून येऊन अभिनेता बनायचं होतं. चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून स्ट्रगल करण्यासाठी माझा दुसरा छंद एडीटींग आणि रेकॉर्डिंग मधून पैसे कमवण्यासाठी तू मला न विचारता तुझं मंगळसूत्र विकलं आणि मला लॅपटॉप घेऊन दिलास”.
पुढे त्याने असंही म्हटलं आहे की, “मुंबईत राहायला, खायला पैसे नव्हते म्हणून भाड्याचा खोलीचे पैसे कमविण्यासाठी पप्पांबरोबर तू पण दोन हजार पगाराची पार्ट टाइम नोकरी केलीस पण कधीच म्हणाली नाहीस की, संकेत इतकी वर्ष झाली तुझं काहीच घडत नाही आहे. तू अभिनयाचा नाद सोड आणि परत गावला येऊन नोकरी कर. मी रडत खडत का होईना पण युनिवर्सबरोबर एकाच गोष्टीसाठी भांडत होतो की आत्ता माझ्यासाठी नाही माझ्या आईसाठी मला यशस्वी कर आणि आज आई वडिलांच्या आशीर्वादाने सगळं काही आहे”.
आईसाठी केलेल्या भावुक पोस्टमध्ये त्याने असंही म्हटलं आहे की, “माझ्या कुटुंबाशिवाय माझं जगणंच व्यर्थ आहे. आई. तुझ्यावरचं हे प्रेम हा आदर मी मरेपर्यंत कायम असेल. माझ्या आईने माझ्यासाठी जे जे केलं ते मलाच माहित आहे. त्यामुळे मी आईसाठी काहीही करेन”.