मराठी सिनेसृष्टीत सध्या ज्याची सर्वाधिक चर्चा होतेय, ती व्यक्ती म्हणजे अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रविण तरडे. अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे प्रविण अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शनाची भूमिका उत्तमरीत्या पार पडतायत. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अश्या विविध चित्रपटांसोबत हिंदी सिनेसृष्टीतही प्रविणने आपला जम बसवला आहे. प्रविण एक संवेदनशील लेखक असण्यासोबत त्यांचा रुपेरी पडद्यावरील दरारा प्रेक्षकांना भावून जातो. प्रविणचा ऐतिहासिक चित्रपटांबरोबरच सामाजिक व ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांवर कल अधिक असतो, याची प्रचिती अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे.(Pravin Tarde Parents)

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रविण तरडे यांनी आषाढी एकादशी निमित्त एक खास पोस्ट करत आपल्या चाहत्यांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये प्रविण त्यांच्या आई-वडिलांसोबत पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेताना दिसत आहे. प्रविणचे आई-वडील गेल्या ५० वर्षांपासून पंढरीची पायी वारी करतात, पण कधीही त्यांना विठ्ठलाचे जवळून दर्शन घेता आले नाही. अखेर त्यांची ही इच्छा प्रविणकडे बोलून दाखवली व प्रविण आई-वडिलांसह पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले व आई-वडिलांची ही इच्छा पूर्ण केली.
प्रविण या पोस्टमध्ये म्हणतोय, “काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो, बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय..? तुम्ही म्हणाल तिथं घेऊन जातो, म्हणाल त्या देशात.. ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल.. मी म्हणालो पंढरपूर..? का..? तर ते म्हणाले, की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहीलं, धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा.. जरा निरखून पहायचाय..”(Pravin Tarde Parents)

“मग एका एकादशीला शुटींग बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला.. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं.. त्यादिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा इतकी वर्ष का टिकून आहे.. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं.. वारी चाललेल्या प्रत्येक माऊलीला आषाढीच्या खुप खुप शुभेच्छा”
नुकतंच प्रविणचा ‘चौक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला, त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात प्रविणबरोबर त्यांच्या पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे यांचीही भूमिका आहे. लवकरच प्रविण ‘आणीबाणी’ सिनेमात आपल्याला पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे.