Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkar : सिनेसृष्टीतील सगळीच कलाकार मंडळी एकदा तरी ट्रोलिंगचा सामना करतात. नेटकरी कुठलीही सीमा न बाळगता त्यांना ट्रोल करायची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडिया म्हटलं की ट्रोलिंग हे आलंच. मात्र कलाकारांच्या बाबतीत तर हे ट्रोलिंग अधिक पाहायला मिळत आहे. त्यांचं कौतुक होण्याऐवजी त्यांना अधिक ट्रोल केलं जात आहे. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात तर काही कलाकार स्पष्टपणे या ट्रोलिंगला उत्तर देताना दिसतात. या ट्रोलिंगबाबत, वा ट्रोलर्सबाबत अनेक कलाकारांनी आजवर त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं आहे. अशातच आता अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकर हिनेदेखील ट्रोलर्सबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
“ट्रोलिंग गरजेचंच आहे”, असं म्हणत क्षितिजाने पोस्ट शेअर करत व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये क्षितीजा म्हणते, “आता सगळ्यात सोपी गोष्ट कुठली आहे, माहीत आहे? ट्रोलिंग करणे. एखाद्यानं कुठलाही फोटो-व्हिडीओ पोस्ट केला की, कमेंट्समध्ये जाऊन हवी तेवढी नकारात्मकता पसरवायची. कारण कमेंट्स करणं फ्री आहे ना… एखाद्याचा रंग, उंची काम किंवा अगदी कशावरुनही त्याला वाईट आणि नकारात्मक बोलायचं. म्हणजे आपल्याला त्याबद्दल काही माहीत असो वा नसो; पण कमेंट्समध्ये जाऊन इतकी नकारात्मकता पसरवायची की, त्या माणसाची मानसिक स्थिती खराब झाली पाहिजे”.
त्यानंतर ती असं म्हणते, “पण हे सगळं करण्याआधी आपण किती परफेक्ट आहोत, हे बघणंसुद्धा गरजेचं आहे. आपण आपल्या आयुष्यातली किती ध्येयं पूर्ण केली आहेत, आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे किंवा आपण आपल्या आपल्याकडे किती लक्ष देतो हे महत्त्वाचं आहे. हे सगळे करताना मला प्रामाणिकपणे वाटतं की, ट्रोलिंग खूप चांगलं आणि गरजेचं आहे; पण याची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी. म्हणजे स्वतःबद्दल वाईट बोला, स्वतःला ट्रोल करा, स्वतःबद्दल नकारात्मकता पसरवा”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुईची आवडती व्यक्ती कोण?, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “आम्ही दोघी…”
पुढे ती म्हणाली, “हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर कराल, तेव्हाच तुम्ही इतरांना ट्रोल करणं बंद कराल आणि इतरांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल थोडं जागरुक व्हाल. तरीसुद्धा कधीतरी वाटलंच इतरांना ट्रोल करावं, तर एकदा फक्त आरशासमोर जाऊन उभं राहा, समोरच तुम्हाला कमेंट्स सेक्शन दिसेल”.





