मुलगी ही प्रत्येकाच्या घराची शान असते. आई-वडिलांचा जीव की प्राण असणारी हे लेक सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद आणते. विशेषतः बाप-लेकीचं खास बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. बालपणापासून ते अगदी मोठे होईपर्यंत या लेकीची आवड प्रत्येक बाप पूर्ण करत असतो. स्वतः कष्ट करत, दिवस-रात्र मेहनत करत प्रत्येक वडील आपल्या लेकीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झटत असतो. लेक माहेरहून सासरला जाताना प्रत्येक बापाच्या डोळ्यात अश्रू येतातच. लेकीची सासरी पाठवणी करताना तिच्या काळजीपोटी हळवा होणारा बाप साऱ्यांना हळवा करुन सोडतो. (Prathamesh Parab Wife Emotional)
अशाच बाप-लेकीचा एक सुंदर असा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो. अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रथमेशच्या लग्नातील हा सुंदर असा व्हिडीओ आहे. प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा लग्नात सासरी निघत असताना तिच्या वडिलांबरोबचा भेटीचा हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. हा कॅमेरात सुंदर क्षण तिने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
“शब्द, भावना, श्वास , प्रेम आणि जीव-बाबा”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे बाबा लेकीची सासरी पाठवणी करताना रडताना दिसत आहेत. क्षितिजाही तिच्या बाबांना घट्ट मिठी मारुन रडताना दिसत आहे. बाप-लेकीचा हा हळवं करुन सोडणारा व्हिडीओ पाहून क्षितिजाचं तिच्या बाबांबरोबरचं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लगीनगाठ बांधली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. दोघांच्या विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ समोर आले होते आणि यांतील नववधूवरांच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले. कोणताही अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधेपणाने त्यांनी विवाहसोहळा उरकला असल्याचं पाहायला मिळालं. लग्नात प्रथमेश व क्षितिजा यांनी खूपच धमाल केलेली पाहायला मिळाली.