Mumbai traffic issues : मुंबईतील रस्ते हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मुंबईतील रस्त्यांची सध्याची वाईट स्थिती पाहता प्रत्येकजण हैराण आहे. पावसाळा येण्यापूर्वी या रस्त्यांची तपासणी करुन त्यावर लाखो रुपये खर्च करुन हे रस्ते बनवले जातात. मात्र, पावसाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा रस्त्यांवर खड्डे होतात आणि परिस्थिती आहे तशीच होते. कामावर जाणाऱ्या अनेकांची या रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे तारांबळ उडते. अनेक त्रस्त नागरिक यावर आवाज उठवितात. मात्र, शासनाकडून हवी तशी प्रतिक्रिया मिळत नाही. रस्त्याच्या वाईट स्थितीवरुन अनेक कलाकार मंडळींनीही आवाज उठविला आहे. अनेक कलाकारांना शूटिंगला जाताना वा शुटिंगवरुन घरी परतताना या रस्त्यांच्या वाईट स्थितीला आणि त्यामुळे होणाऱ्या ट्राफिकचा सामना करावा लागतो.
मुंबईतील ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांना आणि त्रासाला अनेक कलाकार मंडळी बळी ठरले आहेत. यावर अनेक कलाकारांनी आजवर आवाज उठविला आहे. अशातच आता मराठी अभिनेता आस्ताद काळेने या विषयावर सडेतोड भाष्य केलं आहे. आस्तादने यापूर्वी अनेकदा सामाजिक, गंभीर विषयांवर सडेतोडपणे भाष्य केलं आहे. अशातच आता आस्तादने घोडबंदर रोडवरील दुरवस्थेचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न करत “इकडे लक्ष द्या जरा”, असं म्हणत व्हिडीओ टॅग केला आहे.
या व्हिडीओमध्ये आस्ताद असं म्हणतोय की, “हा बघा. हा आहे, Golden Quadrilateral रोडचा एक भाग. घोडबंदर रोडची ही अवस्था अजून किती वर्षे असणार आहे गडकरीसाहेब. महाराष्ट्र सरकार. मुख्यमंत्री साहेब. मिरा-भाईंदर आणि ठाणेमधील नगरसेवक. महानगरपालिका. हे कधी सुधारणार आहे? सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या चालक, इतर वाहतूक करणारे चालक, आम्ही खासगी वाहनचालक, दुचाकी चालवणारे. आम्ही सगळ्या नागरिकांनी अजून किती वर्षे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करायचा आहे?”. पुढे अभिनेता म्हणतो, “Golden Quadrilateral असं लिहायला लाज नाही वाटत का? ही काय अवस्था आहे रस्त्यांची? हे कधी सुधारणार? मला उत्तर द्या… मीसुद्धा एक नागरिक आहे. नियमितपणे टॅक्स भरतो. नितीन गडकरीसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, एकनाथ शिंदेसाहेब… अहो, निदान वैयक्तिक इभ्रतीचा प्रश्न म्हणून तरी या सगळ्याकडे बघा…”, असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – अस्खलित मराठी बोलली, आईची साडी नेसून पुरस्कार स्वीकारला आणि…; वाढदिवसादिवशी काजोल भावुक, म्हणाली, “माझी आई…”
यापुढे आस्ताद व्हिडीओद्वारे रस्त्याची परिस्थिती दाखवत असं म्हणतो, “हे बघा, खड्ड्यांचा आकार बघा. आता यात माझ्या गाडीचं काय होतंय बघा. मध्यंतरी पाच दिवस हा रोड कामासाठी बंद ठेवणार असल्याचं कानावर आलं होतं. तशी यंत्र सामग्रीसुद्धा ठेवण्यात आली होती. त्यामुळे एकदा वाहतूक कोंडी झाली होती. पण, आम्हीसुद्धा विचार केला की, कामासाठी हे सगळं आणून ठेवलं आहे; पण काम तर झालेलंच नाही. पाऊसही आता ओसरला आहे; पण तुमची इच्छाच नाही. कारण- तुम्हाला हे भोगावं लागत नाही. तुम्ही आमच्याच पैशांतून हेलिकॉप्टरनं हिंडता. जरा सुधारा. स्वतःला आणि या रस्त्यांनासुद्धा. डोळे उघडा आणि बघा आसपासच्या सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय चाललंय…”, असं म्हटलं आहे.





