आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मराठी मनोरंजन विश्वात या कुटुंबाचं नाव अग्रस्थानी आहे. गेली वीस वर्षे आदेश यांनी त्यांच्या ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. महाराष्ट्राचे लाडके भावोजी अशी ओळख असलेले आदेश यांची ख्याती मात्र सर्वदूर म्हणजे परदेशातही पोहोचली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढत आणि गंमतीशीर खेळ खेळत समस्त महिला वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम आदेश बांदेकर निसंकोचपणे करत असतात. (Aadesh Bandekar On Soham Bandekar)
आदेश बांदेकर यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकरही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुचित्रा यांनी त्यांच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आहे. अनेक हिट चित्रपटांमधून सुचित्रा यांनी मोठा पडदा गाजवला आहे. आदेश व सुचित्रा यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सोहम बांदेकरही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. आई वडिलांपाठोपाठ अभिनयक्षेत्रात त्याने नशीब आजमवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय तो दिग्दर्शन क्षेत्रातही कार्यरत आहे. अनेक मराठी मालिकांमधून सोहमने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरु असलेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा बांदेकर कुटुंब सांभाळत आहे. सुचित्रा व आदेश बांदेकर यांनी निर्मितीची धुरा पेलवली असून ‘सोहम प्रॉडक्शन’ अंतर्गत या मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. सोहमने या प्रॉडक्शन अंतर्गत खूप मोठी जबाबदारी अंगावर घेतली आहे. आणि ही जबाबदारी तो उत्तमरीत्या निभावत आहे. नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सोहमच्या मेहनतीचं, कामगिरीचं कौतुक त्याच्या आई-वडिलांडून झालेलं पाहायला मिळालं.
सोहमबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “जसं झी मराठीच एकत्र कुटुंब आहे, तसं आमचसुद्धा कुटुंब खूप मोठं आहे. आणि आम्ही आमच्या कुटुंबात एकमेकांची मनं जपत असतो. एकमेकांना पाहून आम्ही मोठे झाले आहोत. हे करत असताना मी सोहमला शाळेत असताना कायम एक गोष्ट सांगायचो, शाळेत किती गुण मिळतात यापेक्षा तू माणूस म्हणून किती गुण मिळवतोस हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते मिळवण्यात तो यशस्वी ठरतोय याचा मला जास्त आनंद आहे”.