मल्याळम चित्रपटसृष्टी व टेलिव्हीजन विश्वातून एक दुःखद घटना समोर आली आहे. अभिनेता विष्णु प्रसादचं निधन झालं आहे. विष्णुच्या निधनाचं वृत्त समोर येताच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून यकृताशी संबंधित आजारामुळे तो त्रस्त होता. रुग्णालयामध्ये विष्णु उपचार घेत होता. त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. शुक्रवारी (२ मे) कोचीमधील एका रुग्णालयात त्याने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. विष्णुच्या इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. त्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (malayalam actor vishnu prasad passes away)
विष्णुने कलाक्षेत्रामध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र गंभीर आजाराने त्याला घेरलं. यकृताच्या आजारामुळे विष्णुला अनेक शारिरीक समस्या उद्धभवल्या. आजाराशी दोन हात करत त्याने उत्तम आरोग्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र अखेरीस विष्णुला मृत्यूने कवटाळलं. लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. विष्णु व त्याचं कुटुंबिय यासाठी तयार होतं.
आणखी वाचा – मासिक पाळीमध्ये जेवण बनवलं म्हणून सासू-नणंदांनी ‘ति’ला संपवलं, दोन पोरं कायमची पोरकी
विष्णुची मुलगी त्याला यकृत दान करण्यासाठीही तयार होती. यासाठी लागणारा खर्च जवळपास ३० लाख रुपये होता. जगण्याची इच्छा असतानाही पैशांअभावी विष्णुला लिव्हर ट्रान्सप्लांट करता आलं नाही. त्याच्या कुटुंबियांनी उपचारासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ३० लाखांची रक्कम जमवणं विष्णु व त्याच्या कुटुंबियांना शक्य झालं नाही.
आणखी वाचा – अनिल कपूर यांच्या आईला अखेरचा निरोप, कपूर कुटुंबिय दुःखात एकत्र, भावुक व्हिडीओ समोर
काही रिपोर्ट्सनुसार, आर्थिक अडचणींमुळे विष्णु आणि त्याच्या कुटुंबियांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. असोसिएशन ऑफ टेलिव्हीजन मीडिया आर्टिस्ट हा संस्थेमार्फतही विष्णु व त्याच्या कुटुंबियांनी पैसे जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे काही सकारात्मक घडेल ही आशा असतानाच विष्णुने कायमचा सगळ्यांचा निरोप घेतला. त्याने आजवर कासी, रनवे, मांबझक्कलम, लायन, बेन जॉनसन, लोकनाथन IAS, पथाका सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. शिवाय बऱ्याच मालिकांमध्येही त्याने उत्तमोत्तम काम केलं.