झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालितकेमुळे ती मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनली. या मालिकेनंतर ती अनेक जाहिराती आणि इतर कार्यक्रमांतही झळकली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मायराने लहान वयात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वी मायराच्या आई-वडिलांनी खुशखबर दिली होती. मायरा मोठी बहीण होणार असल्याची आनंदवार्ता त्यांनी सांगितली होती.
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी ही गोड बातमी शेअर केली होती. त्यावेळी मायराची आई श्वेता वायकुळ सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर मायराच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे मायराला भाऊ झाला असून आता मायरा ताई म्हणून मिरवणार आहे. मायराच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तिच्या लहान भावाबद्दलची गुडन्यूज शेअर करण्यात आली आहे. “आमचा छोटा सुपरहिरो आला आहे” असं म्हणत मायराने लाडक्या भावाबद्दलची खुशखबर दिली आहे.
मायराच्या रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. एखादा सण असो किंवा खास दिवस… मायराचे हटके फोटो किंवा व्हिडीओ या अकाऊंटद्वारे शेअर केले जातात. अशातच त्यांनी ही गुडन्यूजदेखील शेअर केली आहे. यानिमित्ताने मायराने खास फोटो शेअर केले असून या फोटोमध्ये काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिच्या हातात ‘बेबी बॉय’ लिहलेला एक बोर्ड आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्यामागे आई-वडील असलेले पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मायराच्या या फोटोला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोखाली कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत मायराचे व तिच्या आई-वडिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी मालिका व मराठी चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मायराने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता तिच्या आयुष्यात आलेल्या लहान भावामुळे तिचा आनंद द्विगुणित झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.