मराठीमध्ये सध्या नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘देवमाणूस’. महेश मांजरेकर व रेणूका शहाणे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘देवमाणूस’ने प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या धाटणीची कथा आणली. चित्रपटगृहांमध्ये याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महेश व रेणुका यांच्यासह सुबोधचीही मुख्य भूमिका चित्रपटात आहे. दिग्गज कलाकार ‘देवमाणूस’मध्ये असताना एक नव तरुण कलाकार भलताच भाव खाऊन गेला. तो म्हणजे सिद्धार्थ बोडके. सिद्धार्थने ‘देवमाणूस’मध्ये साकारलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने केलेल्या कामाचं प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक करण्यात येत आहे. (devmanus Marathi movie)
दिग्गज कलाकारांबरोबर काम करणं हे सिद्धार्थचं स्वप्न होतं. ते ‘देवमाणूस’मुळे सत्यात उतरलं. त्याने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम पार पाडली. जीव ओतून काम करणाऱ्या सिद्धार्थला सिनेरसिकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. यासगळ्यामध्ये बायको तितीक्षाने केलेलं कौतुक सिद्धार्थला आनंद देऊन जाणारं होतं. याचबाबत त्याने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – Video : खांद्यावर पदर, मराठमोळा साज अन्…; कार्तिकी गायकवाडचा भावाच्या लग्नासाठी थाट, गायलं खास गाणं
ITSMAJJAला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला, “तितिक्षा इतकं मला दुसरं कोणीच ओळखत नाही. सिद्धार्थ म्हणून माझ्या चेहऱ्यावरील छोटे-मोठे हावभाव तिला चोख माहित आहेत. ‘देवमाणूस’ पाहिल्यानंतर आम्ही घरी सगळे बसलो होतो. ती होती अनघा होती. तेव्हा तिने मला सांगितलं की, मला तू कुठेच तू वाटला नाहीस. तिची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी सरप्राइज होती”.
“आपल्याला जी व्यक्ती पूर्णपणे ओळखते तिलाच आपण वेगळं वाटलो तर ती माझ्यासाठी महत्त्वाची प्रतिक्रिया होती. अनघा जी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तीही मला बोलली की, तू खूप वेगळाच वाटत होतास. तर आपल्याला ओळखणाऱ्या माणसांनी दिलेली प्रतिक्रिया नेहमीच खूप मस्त असते”. यावेळी सिद्धार्थने त्याच्या वाढत्या वजनाविषयही सांगतिलं. एका चित्रपटासाठी त्याने तब्बल १४ ते १५ किलो वजन वाढवलं होतं. मात्र तो चित्रपटच नंतर बंद पडला. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सिद्धार्थ प्रयत्न करत असतानाच ‘देवमाणूस’ त्याच्याकडे आला. मग वाढलेलं पोट व वजन त्याला या चित्रपटाच्या भूमिकेसाठी उपयोगी ठरलं.