‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जगभरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते दिवाने आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा चाहतावर्ग देखील आहे. आजवर या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या अभिनयशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवला आहे. अशातच विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री नम्रता संभेराव हिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नम्रताची प्रत्येक विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ आहे. (Namrata Sambherao Husband Emotional)
सगळ्यांना खळखळवून हसवणाऱ्या या नम्रताच्या आयुष्यात बरेच टर्निंग पॉईंट आले. यावेळी तिचा नवरा योगेश संभेराव याने नम्रताला दिलेली साथ कौतुकास्पद आहे. आज दोघेही प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.नम्रताचा स्ट्रगल इतर कोणाहीपेक्षा तिच्या जवळच्या व्यक्तीने म्हणजेच तिच्या नवऱ्याने जास्त पाहिला आहे. गरोदरपणानंतरच तिचं कमबॅक हा खूप कठीण काळ होता, आणि यावेळी नम्रताच्या नवऱ्याने दिलेली साथ विशेष आहे.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत नम्रताच्या नवऱ्याने बायकोचं कौतुक करत म्हटलं की, “लग्नाआधी फार पूर्वीपासून मी नम्रताला ओळखतो. त्यावेळी मी दर सहा महिन्यातून एक दोनदा तिला फोन करायचो आणि तिच्या अभिनयाचं कौतुक करायचो शिवाय काही कमी जास्त वाटत असेल तर ते ही एक मित्र म्हणून खुलेपणाने सांगायचो. नम्रताही सांगितलेला बदल विचारात घेऊन त्यावर काम करायची. असा तो तिचा हळू हळू सुरु झालेला प्रवास मोठा होतं गेला. आणि आता तर आमिर खानपासून अगदी अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतचे दिग्गज लोक, ज्यांना आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत, हे लोक तिचे चाहते आहेत असं ते स्वतः बोलतात, हे ऐकून डोळ्यात पाणी येतं”.
यापुढे योगेश म्हणाला, “खरंच आपल्याकडे इतकं काही आहे हे आपल्याला माहित नाही, हे खूप चांगलं आहे. आणि खूप काही आहे हे माहित न झालेलं बरं आहे असं मला वाटतं म्हणून मी तिचं कधी फार कौतुक करत नाही पण माझे डोळेच तिला तिच्या कामाबद्दल नेहमी सांगत राहतात”, असं म्हणत योगेशने नम्रताच्या कामाचं कौतुक केलं.