Namrata Sambherao Post : मराठी कलाकार मंडळी सध्या रंगभूमीकडे वळली आहेत. आणि रंगभूमीवरील नाटकांनाही प्रेक्षकवर्ग आवर्जून हजेरी लावताना दिसत आहे. प्रेक्षकांचा या नाटकांना मिळणारा भरभरुन प्रतिसाद पाहता आता नाटकांची रांगच लागली आहे. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले कलाकारही आता नव्या नाटकातून रसिकांच्या भेटीस आले आहेत. ‘थेट तुमच्या घरातून’ हे हास्यजत्रेतील कलाकारांचे नाटक सध्या रंगभूमी गाजवत आहे. या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली असून हाऊसफुल्लच्या बोर्डवरही आपले नाव कोरले आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा दौरा आता महाराष्ट्रभर सुरु असून प्रेक्षकवर्ग या नाटकाला उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहे.
‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकांत प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर ही कलाकार मंडळी दिसत आहेत. याचबरोबर अभिनेत्री भक्ती देसाईदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. हे नाटक पाहायला महाराष्ट्राची हास्यजत्राच्या प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कॉमेडी शोचे जगभरात लाखो चाहते आहेत. आणि या शोमधील कलाकारांना पाहायला तर प्रेक्षकांची रांगच लागलेली असते. अशातच नम्रताने तिच्या एका चाहत्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत तिचे हे चाहते अंध असल्याचं दिसत आहे, आणि नाटकाचा आनंद घेताना ते ढसाढसा रडताना दिसत आहेत.
आणखी वाचा – Video : मुंबईतील भुयारी मेट्रोत घुसलं पावसाचं पाणी, वरळी स्थानकाचं भयावह दृश्य, प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत भरुन पावले असल्याचं म्हटलं आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “त्यांनी नाटक पाहिलं म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने नाटक अनुभवलं. खूप आभार त्यांना नाटकाला घेऊन आलात त्याबद्दल आणि हा अंगावर शहारा आणणारा क्षण आमच्याबरोबर हा क्षण शेअर केला. आभारी आहे. एक नाट्यकलाकार म्हणून भरुन पावले. काल विष्णुदास भावे नाट्यगृह येथील ‘थेट तुमच्या घरातून’ या आमच्या नाटकाला काही खास रसिक प्रेक्षक आले होते. हा व्हिडीओ आणि हा क्षण मी मनात साठवून ठेवणार आहे. ही प्रतिक्रिया दाद म्हणजे कामाची पावती”.
पुढे तिने म्हटलं आहे की, “नाटकासाठीची मनोरंजनासाठीची केलेली धडपड आज फळली. आमच्या नाटकात शेवटी माझ्या तोंडी म्हणजेच एका आईच्या मनातली तिच्या मुलांविषयी, नवऱ्याविषयी असणारी भावना मांडणार एक संदेशपर स्वागत आहे. जो नाटकाचा विषय आहे. ज्यात कुटुंबात असलेल्या संवादातील अंतराबाबत भाष्य केलं आहे. प्रसाद खांडेकरने हे नाटक उत्तम लिहिलंय. आणि त्यामुळेच हे नाटक प्रत्येकाच्या मनात घर करुन आहे. म्हणून आम्ही कलाकार म्हणतो नाटक हा आमचा श्वास आहे. कलाकार म्हणून जगायला त्याची नितांत गरज आहे. नाटक जपुया, जगवूया आणि प्रयोग करत राहुया”.