‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. या कार्यक्रमाचे लाखो दिवाने चाहते आहेत. अगदी जगभरात या कार्यक्रमाचे चाहते असून या कार्यक्रमाने साऱ्यांना खळखळवून हसवलं आहे. महाराष्ट्राबरोबरच परदेशातील प्रेक्षकांसाठीही महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम नेहमीच सज्ज असते. हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी स्कीटने व अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यांतील कॉमेडीची क्वीन म्हणून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताने तिच्या हटके कला कौशल्याने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Namrata Sambherao Emotional Post)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील नम्रता संभेराव ही ‘लॉली’ हे पात्र साकारते. अभिनेत्रीने तिच्या अभिनयामुळे हे पात्र आणखी फुलवले आहे. त्यामुळे या पात्राची सोशल मीडियासह अनेक प्लॅटफॉर्म्सवर लोकप्रियता पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांमध्ये या लॉली पात्राची क्रेझ पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या या लॉलीचा नुकताच वाढदिवस झाला. अभिनेत्रीच्या वाढदिवसादिवशी तिला तिच्या चाहत्यांकडून तसेच कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांनीही केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला.
या सगळ्या चाहत्यांच्या शुभेच्छा, कलाकारांच्या शुभेच्छा आणि प्रेम पाहून नम्रता भावुक झालेली पाहायला मिळाली. सिनेसृष्टीत कोणताही वारसा नसताना नम्रताने कलेच्या जोरावर स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे नम्रताला वाढदिवसादिवशी मिळालेलं हे प्रेम पाहून ती भावुक झाली. “मी खूप नशीबवान समजते स्वतःला कारण माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी माणसं माझ्या आयुष्यात, माझ्या आजूबाजूला आहेत. आपण कोणासाठी इतके खास आहोत हे वाढदिवसाच्या दिवशी आणखी अधोरेखित होतं आणि मग अजून उत्साह वाढतो. ऊर्जा मिळते”.
पुढे तिने असं म्हटलं आहे की, “वेळात वेळ काढून मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. स्टोरी पोस्ट केल्या. मॅसेज केले. कॉल केले. भरभरुन शुभेच्छा दिल्या आणि भेटवस्तूही भरपूर मिळाले. असाच प्रेमाचा, आपुलकीचा असाच वर्षाव करा कारण कौतुक, प्रेम प्रत्येकाला हवं असतं यामुळे आयुष्यात जगण्यासाठी सुखाची व आनंदाची अधिक भर पडते”. या पोस्टसह नम्रताने सुंदर असे फोटोही शेअर केले आहेत.