आयपीएल हा प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या अगदी जवळचा विषय. प्रत्येकवर्षी चाहते आयपीएलची चातकासारखी वाट बघत असतात. यंदाच्या आयपीएल हंगामाबाबत देखील चाहते असेच उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं. अखेर आयपीएल सुरु झाली आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसू लागला. आपल्या आवडत्या संघाला, आवड्त्याला खेळाडूला चाहते मनापासून पाठिंबा देऊ लागले आणि खेळाडूंच्या दमदार खेळीने आयपीएलचा थरार चांगलाच रंगू लागला. या स्पर्धेतील महत्वाच्या संघांपैकी काही संघ म्हणजे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. या संघांमध्ये असणारे काही खास खेळाडूंचा चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. यंदाचं आयपीएल पर्व यापैकी एका खेळाडूमुळे चांगलंच चर्चेत आहे तो खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्स संघांचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार रोहित शर्मा. (Rohit Sharma Lucknow Super Giants)
आयपीएल २०२४ या पर्वात मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधार पद हार्दिक पांड्याला देण्यात आलं. आणि मुंबई इंडियन्सच्या संघाला चाहत्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यासोबतच रोहित शर्माच्या नाराजीचे काही व्हिडीओज, फोटोज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे पुढच्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार नसल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले. त्यासोबतच लखनऊ सुपर जाईंट्सचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या एका विधानामुळे रोहित शर्मा पुढील हंगामात लखनऊच्या संघाकडून खेळणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत.
Justin Langer's priceless reaction on getting Rohit Sharma in the mega auction.#RohitSharma #MIvsDC#IPL2024pic.twitter.com/C4820AclEm
— Ankit Duhan (@an_kit_duhann) April 9, 2024
एका मुलाखती दरम्यान जस्टिन यांना पुढील हंगामात होणाऱ्या मेघा लिलावा दरम्यान तुमची नजर कोणत्या दिग्गज खेळाडूवर असेल असं विचारण्यात आलं. या दिग्गज खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा देखील समावेश असू शकतो असं ही जस्टिन यांना सांगण्यात आलं त्यावर आश्चर्यचकित होऊन जस्टिन यांनी “रोहित शर्माला मुंबई संघ सोडेल असं तुम्हाला वाटतं? तसं झालं तर कोणाला नाही आवडणार एवढा मोठा खेळाडू आपल्या संघात यावा? पण तूर्तास असं होईल असं मला वाटतं नाही”. असं सूचक उत्तर जस्टिन यांनी दिलं. रोहित शर्माचं नाव घेताच जस्टिन यांचे भाव काहीसे बदललेले पाहायला मिळाले त्यावरून लखनऊच्या जर्सीमध्ये रोहित शर्मा दिसणार का? लखनऊ संघाचं कर्णधार पद रोहित शर्माच्या हाती जाणार का? यासारखे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. (Rohit Sharma Lucknow Super Giants)
मुंबई इंडियन्स संघातील सध्याचे वातावरण बघता संघ व्यवस्थापनावर प्रेक्षकांचा प्रचंड राग दिसून येत आहे. आणि अध्याप ही या बाबत संघ व्यवस्थापनाने कोणताही आश्वासक निणर्य घेतलेला दिसत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी सक्षम ठरणार का? हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघ कशी कामगिरी करणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.