लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी नुकतीच संपली असून काल (४ जानेवारी) रोजी या निवडणुकांचा निकालही लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ५४३ लोकसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होती आणि याची काल, ४ जूनला मतमोजणीही पार पडली. भाजपाप्रणीत एनडीएने २९३ जागा जिंकल्या असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय मिळवला आहे. याच निकालाबद्दल सामान्य नागरिकांसह मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी “राजकारण करा, पण कटकारस्थान, पक्ष फोडणे, ईडी व आयटीचा दूरुपयोग करु नका. खरे वाघ हे कोण ते कळलंच असेल. खरी श्रद्धा आणि श्रद्धेचा दिखावा यात खूप अंतर आहे. जनतेचा कौल विनम्रतेने स्वीकारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.” असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर गायिका आर्या आंबेकरने “हा देश पुन्हा एकदा एका निस्वार्थी व जबाबदार व्यक्तीच्या हातात गेल्याबद्दल आनंद आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता प्रसाद ओकच्या पत्नीने या निकालावर “आज आपण काय शिकलो? Berger Paint धुळीला भिंतीवर टिकू देत नाही” अशी एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. तर प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने “आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय लोकशाहीचा झाला” असं म्हणत त्याचं मत व्यक्त केलं आहे. क्षितिजची ही पोस्ट अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शेअर करत त्याला पाठींबा दिला आहे.

तसेच अभिनेत्री केतकी चितळेनेही “आज लोकशाहीचा विजय झाला. कुठलाही राजकीय पक्ष नाही, पण लोकशाही जिंकली” अशी पोस्ट शेअर केली आहे. तसंच अभिनेता आशुतोष गोखलेनेही “लोकशाहीचा विजय” असं लिहित इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. तसंच अभिनेता शशांक केतकरने “कृपा करून आम्हाला जगायला सुरक्षित, प्रगत, स्वच्छ व आनंदी देश द्या” असं म्हटलं आहे.
दरम्यान, देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार की नव्याने सत्तापालट होणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला यंदा कमी जागांवर यश संपादन करता आलं आहे.