Ashok Saraf Padma Shri Award : महाराष्ट्राचे लाडके महानायक म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते अशोक सराफ आजवर आपल्या निखळ अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशोक सराफ यांच्या यांच्या या अभिनयाचा मानाचा पदमश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण होता. काल दिल्ली येथे या पुरस्कार सोहळा पार पडला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातून अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर हा खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत त्यांनी आपल्या भावनादेखील शेअर केल्या आहेत.
अशोक सराफ म्हणाले, “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या”. या सोहळ्याला अशोक सराफ यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अन्य कुटुंबीयही उपस्थित होते. आज प्रत्येक क्षेत्रातून अशोक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
यंदा पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कऱण्यात आली. या यादीत अशोक सराफ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची नावे घेण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी (२७ मे २०२०५) रोजी पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीश धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अशोक सराफ यांच्या या सन्मानानंतर चाहत्यांसह सिनेसृष्टीतून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनी हा अभिमानाच हा क्षण शेअर करुन अशोक सराफ यांना शुभेच्छा दिल्या.
अनेक मराठी, हिंदी चित्रपट, विविध धाटणीची नाटकं, मराठी हिंदी मालिका यांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा झाले आणि प्रेक्षकांच्या या लाडक्या अशोक मामांनी अनेक वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. अशोक मामांच्या मनोरंजनाची सुसाट गाडी आज ही अविरत सुरु आहे.