प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे आपल्या आई-वडिलांना विमानातून हे जग फिरवण्याचे स्वप्न असते. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करतही असतात. मात्र प्रत्येक मुला-मुलीला यात यश मिळतच असं नाही. असंच मराठीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे आईला विमानातून फिरवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं. आपल्या आईला विमानातून घेऊन न जाता आल्यामुळे अभिनेत्रीने तिच्या आईच्या काही खास गोष्टींना विमानप्रवास घडवून आणला आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे छाया कदम.
‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’ तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’ व ‘मंडगाव एक्सप्रेस’ अशा बॉलीवूड चित्रपटांद्वारे अभिनय करत त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी चोख बसतात आणि छाया कदम ती भूमिका अगदी चोखपणे निभावतातदेखील.
आपल्या आशयघन अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या छाया कदम त्यांच्या सोशल मीडियाद्वारेही तितक्याच चर्चेत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. छाया कदम यांनी त्यांच्या आईसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आईविषयी भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’पर्यंत घेऊन आले याचे समाधान आहे. आई, आज हे सगळं पाहण्यासाठी तू हवी होतीस”.
आणखी वाचा – अर्जुनच्या वाहिणीकडून अप्पीचा अपमान, दोघांमधला कडूपणा अजूनही कायम, अमोल-अर्जुन यांची भेट नक्की कधी होणार?
दरम्यान, छाया कदम यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खूप प्रेम छाया ताई, तुझा अभिमान वाटतो, तुमच्या आईलाही तुमचं अभिमान वाटत असेल, तुमच्या अभिनयाला तोड नाही, तुमची आई जिथे कुठे असेल तुम्हाला पाहत असेल” अशा अनेक कमेंट्सद्वारे या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.