मनोरंजनविश्वात कलाकार मंडळी एकमेकांसोबत काम करत असतानाच एकमेकांचे जिगरी दोस्तही होऊन जातात. दिवसातला बराचसा वेळ सेटवर एकत्र घालवल्यामुळे त्यांच्यात झालेली मैत्री घट्ट असते. मराठी सिनेविश्वातील अशीच एक मित्रांची जोडगोळी म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके व संतोष जुवेकर. हे दोघेही ‘स्ट्रगलर साला’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्यातील मैत्री प्रत्येकाला आपलीशी वाटते. हे दोघे सोशल मीडियावर त्यांच्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच कुशलने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Kushal Badrike shared a funny video)
नुकताच १२ डिसेंबर रोजी अभिनेता संतोष जुवेकरचा वाढदिवस साजरा झाला. याच वाढदिवसानिमित्तचा खास व्हिडीओ कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संतोष त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट मिळावे म्हणून कुशलला घेऊन मॉलमध्ये गेला होता. मात्र तिथे गेल्यानंतर त्याची फजिती झाली आणि याच फजितीच्या झलक कुशलने त्याच्या व्हिडीओमधून दाखवली आहे. झालं असं की, संतोषला कुशलकडून एका लोकप्रिय ब्रॅंडचे शूज गिफ्ट म्हणून हवे होते. पण दोघेही मॉलमध्ये पोहोचले तेव्हा समजलं की, त्या ब्रॅंडचं शोरुम कायमचंच बंद झालं आहे.
आणखी वाचा – ‘जवान’च्या दिग्दर्शकाची कपिल शर्माने रंग-रुपावरुन उडवली खिल्ली, इंडस्ट्रीमध्ये संताप, असं का बोलला?
त्यामुळे संतोषचा हा कुशलकडून महागडं गिफ्ट घेण्याचा प्लॅन फसला आणि हे सगळं कुशलने एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे. त्याचबरोबर कुशलने या व्हिडीओखाली खास कॅप्शनही लिहिलं आहे, ज्यात त्याने असं म्हटलं आहे की, “तसं आम्ही मैत्रीत गिफ्ट वगैरे देत-घेत नाही. पण संत्या या सगळ्याला अपवाद आहे, आता त्याला कोणत्या तरी एका ब्रॅंडचे शूज ‘माझ्या कडून’ बर्थडे गिफ्ट म्हणून हवेच होते. खरं तर त्याचा बर्थडे होऊन आता आठवडा उलटून गेला आहे. तरीही त्या गिफ्टसाठी आज तो मला जबरदस्तीने मॉलला घेऊन गेला. हे कोण मित्र असतात जे गिफ्टसाठी एवढी जबरदस्ती करतात? अरे काय गिफ्ट आहे की खंडणी”.
दरम्यान, या व्हिडीओखाली संतोष पुन्हा एकदा कमेंट केली आहे आणि असं म्हटलं आहे की, “पण तू सुटलायस असं समजु नकोस… सबका बदला लेगा ये फैजल”. तर अभिनेत्री हेमांगी कवीनेही या व्हिडीओवर कमेंट केली आहे आणि म्हटलं आहे की, “उद्या आपण पॅलेडियम फिनिक्स मॉलला जात आहोत”. तसंच अनेकांनी त्यांना कुशल-संतोषचा हा भन्नाट व्हिडीओ आवडल्याचं लाईक्स व कमेंट्सद्वारे म्हटलं आहे.