भारतीय चित्रपटसृष्टीतून एकामागोमाग एक वाईट बातम्या येत आहेत. प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री मल्लिका राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर केरळ चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ६५ वर्षीय दिग्दर्शक प्रकाश कोलेरी हे मंगळवारी वायनाड येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या घरी ते एकटेच राहत होते. प्रकाश कोलेरी यांनी त्यांच्या दिग्दर्शन कारकिर्दीची सुरुवात ‘मिजीथलील कन्निरुमयी’ (१९८७) या चित्रपटाद्वारे केली, त्यांचा शेवटचा चित्रपट २०१३मध्ये प्रदर्शित झालेला ‘पट्टुपुस्तकम’ हा होता. (Prakash Koleri Death)
प्रकाश कोलेरी यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहते व कलाक्षेत्रातील कलाकार मंडळी त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. प्रकाश कोलेरी यांनी ‘अवन आनंदपद्मनाभन’, ‘वरुम वरतीरिक्किला’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याशिवाय त्यांनी इतर चार चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. कोलेरी यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा पत्ता नव्हता. त्याचे नातेवाईक त्याच्या घरी पोहोचले असता त्यांना मृतदेह दिसला.
प्रकाश कोलेरी यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी घटनास्थळ गाठले आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरु केला. प्रकाश कोलेरी केरळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक होते. २०१३ साली त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते दिग्दर्शनापासून दूर राहू लागले. त्यानंतर अनेक दिवस ते चित्रपटसृष्टीतही सक्रिय नव्हते.
अलीकडेच सुलतानपूरची प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ मलिका राजपूत हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिनेत्रीचा मृतदेह घराच्या खोलीत लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.