करण जोहर त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरचं वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अशातच आता तो त्याच्या मुलांमुळे चर्चेत आला आहे. करण जोहर दोन मुलांचा वडील आहे. २०१७ मध्ये सरोगसीद्वारे त्याने मुलगा यश व मुलगी रुही यांचे स्वागत केले. तो एकट्याने त्याच्या मुलांचा सांभाळ करत आहे. करण सध्या आई व वडिलांची भूमिका एकट्याने निभावत आहे. करण जोहर अनेकदा आपल्या मुलांबरोबरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अलीकडेच करण जोहरने फेय डिसूझाला दिलेल्या एका मुलाखतीत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. (Karan Johar Reveals Children Questions)
यावेळी बोलताना त्याने सांगितलं की, आता त्याची मुले मोठी होत आहेत आणि हळूहळू प्रत्येक गोष्टींबद्दल त्यांची समजही वाढत आहे. अशा परिस्थितीत ते नेहमीच विचित्र प्रश्न विचारत त्याला भंडावून सोडत आहेत. बरेचदा मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याला गोंधळून जायला होते. करण जोहरची आई हिरू जोहर त्याची मुले यश व रुही यांच्या आईची भूमिका साकारत आहे. अशा स्थितीत एके दिवशी करणच्या मुलांनी असे विचारले की, “त्यांची आई कोण आहे?”. हिरू जोहर ही तर त्यांची आजी आहे.”ते कोणाच्या पोटी जन्माला आले?”, असाही ते प्रश्न करतात. करण जोहरने यावेळी बोलताना कबूल केले की, जेव्हा तो या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही तेव्हा तो त्याच्या काऊन्सलरची मदत घेतो.
ज्येष्ठ चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरचे असे म्हणणे आहे की, पालक होणे सोपे काम नाही. मुलांच्या अशा प्रश्नांशी त्याला रोज झगडावे लागते. त्याने पुढे सांगितले की, या असुरक्षिततेमुळे तो अनेकदा आपल्या मुलाला असंवेदनशील गोष्टी सांगतो. आपल्या मुलाच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असलेल्या करणने एकदा यशला जेवतानाही टोकले. मात्र त्यानंतर त्याला खूप वाईट वाटले.
करण जोहरने या मुलाखतीत सांगितले की, तो लहानपणी त्याच्या वजनामुळे अस्वस्थ होता. त्याला ही जनुके त्याच्या आईकडून मिळाली आणि आता ती जनुके त्याच्या मुलामध्ये आली आहेत. यामुळे स्वत: ज्या अडचणीतून तो गेला आहे त्या अडचणीतून त्याच्या मुलगा गेला नाही पाहिजे हा त्याचा एकमेव उद्देश आहे. पण, करण जोहरनेही स्पष्ट केले की, त्याला निर्बंधात ठेवणारे पालक बनायचे नाही आहे. त्यांच्या मुलांनी त्यांना जे जगायचं आहे ते जगावं असं त्याला वाटतं.