छोट्या पडद्यावरील विनोदी मालिकांमधील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. विशेष म्हणजे मालिकेतील दयाबेन या पात्राने तर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी साकारत होती. पण त्यानंतर तिने मॅटर्निटी ब्रेक घेतला आणि पून्हा मालिकेत परतलीच नाही. त्यानंतर बऱ्याच कलाकारांनी एकामागोमाग ही मालिका विविध कारणांमुळे सोडली. रोशन सिंग सोधीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी जेनिफर मिस्त्रीनेही मालिकेचे निर्माते असित कुमार मोदींवर छेडछाडीचा आरोप करत ही मालिका सोडली होती. दरम्यान अशी बातमी समोर येत आहे की आता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अभिनेत्री मोनाज मेवावलाची निवड केली आहे. यापूर्वी हे पात्र अभिनेत्री जेनिफर मिस्त्री साकारत होती. नुकताच तिने याबाबत प्रतिक्रिया देत या भूमिकेबाबत वक्तव्य केलं. (Jennifer mistry spoke about replacement of roshan)
‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने मोनाजबाबत वक्तव्य केलं.जेनिफर म्हणाली, “मोनाज खूप सुंदर मुलगी आहे. ती खूप हुशारही आहे. मी आशा करते आणि प्रार्थनाही करते की ती हे पात्र खूप छान साकारत पुढे जाईल. ती माझ्या आधीपासून या इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला आजपर्यंत तिची ओळख मिळाली नव्हती. या कार्यक्रमातून व मिसेस रोशनच्या पात्रामुळे तिला योग्य ती प्रसिद्धी व ओळख मिळेल अशी मी आशा करते”.
पुढे जेनिफरने तिच्या रोशनच्या पात्राबद्दल सांगताना स्पष्ट केलं की, “मी रोशन या पात्राला माझ्या आयुष्यातून आता मुक्त केलं आहे. हे पात्र आणखी यशस्वी व्हावं अशीच मी प्रार्थना करते. या पात्रासाठी मोनाजची निवड झाल्याची बातमी कळली. त्यामुळे माझा विश्वास आता दृढ झाला आहे कारण मी त्यासाठी प्रार्थना केली होती”.
पात्रासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड झाल्याचं विचारल्यानंतर जेनिफर म्हणाली, “या बातमीचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. रोशनची भूमिका करण्याऱ्या व्यक्तिबाबत माझ्या मनात फक्त प्रेम आहे, मला हे देखील कळून आलं आहे की कार्यक्रमातील रोशनचं ऑनस्क्रीन कुटुंबदेखील माझ्यासारखंच त्रस्त होतं. त्यात फार सीन्स नव्हते. त्यामुळे आता यापुढे माझ्यासाठीही गोष्टी चांगल्या होतील आणि मी यामुळे बरीच आनंद आहे”, असं सांगत तिने आपलं मत व्यक्त केलं.