बॉलिवूड चित्रपटांची चलती असताना एकामागोमाग एक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करू लागले आहेत. प्रेक्षकांनीही पुन्हा एकदा मोठया संख्येने चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली आहे. अशातच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बक्कळ कमाई केली त्यानंतर आता त्याचा ‘जवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘जवान’ चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. (Girija Oak New Movie)
‘जवान’ चित्रपटाची खास आकर्षणाची बाजू म्हणजे मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक हिने शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये साकारलेली महत्वपूर्ण भूमिका. ‘जवान’च्या प्रिव्ह्यू व्हिडीओमध्ये गिरीजाची बंदूक चालवतानाची झलक प्रेक्षकांना विशेष भावली. तेव्हापासूनच गिरिजाच्या या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. ‘जवान’ तर आता प्रदर्शित झाला आहेच, याबरोबरच गिरिजा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचंही समोर आलं आहे.
‘जवान’नंतर गिरीजा ओक आता विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’मध्ये दिसणार असल्याची माहिती खुद्द गिरिजाने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितली. याविषयी बोलताना गिरीजा म्हणाली, “ ‘जवान’ नंतर मी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’मध्ये दिसणार आहे. आपल्या देशात आपण जी लस निर्माण केली, ती लस बनवण्यामागील गोष्टीवर हा चित्रपट बेतलेला आहे.”
“लस बनवण्यात सहभागी असलेल्या आपल्या ३ महत्त्वाच्या संस्था आणि त्यात काम करणाऱ्या ७०% महिलांची ही गोष्ट आहे. त्यात माझी भूमिका फार वेगळीच आहे. यात नाना पाटेकर यांच्याबरोबर प्रथमच काम करण्याचा अनुभवही अप्रतिम होता. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी येणार आहे.”